बानेगाव पाटीजवळ कार-ट्रकच्या धडकेत दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:28 IST2017-12-13T00:27:34+5:302017-12-13T00:28:10+5:30
कार व ट्रकच्या भीषण धडकेत कारमधील दोघे जागीच ठार झाले तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला.

बानेगाव पाटीजवळ कार-ट्रकच्या धडकेत दोन ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
केदारखेडा : कार व ट्रकच्या भीषण धडकेत कारमधील दोघे जागीच ठार झाले तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. केदारखेडा-राजूर रस्त्यावरील बानेगाव पाटीवर मंगळवारी सकाळी ही घटन घडली.
जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील तीन जण नांदेड जिल्हातील भोकर येथे कारने (क्र.एमएच २४, व्ही. ०४०७) जात असताना केदारखेड्याजवळ जालनाकडून येणा-या ट्रकने (क्र. ए. पी. १६ वाय ९९३९) राजूरकडे वळणा-या कारला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात कारमधील शैंलेंद्र देविदास गुजर (४0 रा़ शेंदूर्णी ता़ जामनेर, जि. जळगाव), समाधान दरबर पारधी (३५ रा़ एकलुती ता़ जामनेर,जि.जळगाव) हे दोघे जागीच ठार झाले आहे. तर विलास ताराचंद पोष्टे (रा़ कळमसरा ) हे गंभीर जखमी झाले आहेत़
अपघातात कारच्या समोरील भागाचा अक्षरश: चुराडा झाला, तर ट्रकची समोरची चाके निखळून पडली. ग्रामस्थांनी कारचे दरवाजे तोडून तिघांना बाहेर काढले. यासाठी राऊल दरक, भागवत वानखेडे, शंकर सहाणे, अंकुश सहाणे आदींनी मदत कार्य केले़ या प्रकरणी ट्रक चालक श्रीरामदास अर्जुनराव मारका (रा. पामर, जि. मच्छलीपट्टम, आंध्र प्रदेश ) याच्याविरुद्ध हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. ग्रामस्थ राऊल दरक यांनी हसनाबाद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांना दूरध्वनीवरून अपघाताची माहिती दिली. लगेच हसनाबाद ठाण्याचे कर्मचारी प्रशांत लोखंडे व संतोष वाढेकर घटनास्थळी पोहोचले.