मेहुण्याचे लग्न आटोपून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात पती-पत्नीसह मुलगा ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 15:55 IST2025-10-07T15:54:35+5:302025-10-07T15:55:01+5:30
महाकाळा फाट्याजवळ धुळे-सोलापूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली.

मेहुण्याचे लग्न आटोपून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात पती-पत्नीसह मुलगा ठार
वडीगोद्री-शहागड : (जि. जालना) धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अंबड तालुक्यातील महाकाळा गावाजवळ सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. उमापूर (ता. गेवराई, जि. बीड) येथे मेहुण्याच्या लग्नाला उपस्थित राहून घरी परतणाऱ्या दुचाकीला कंटेनरने मागून जोरदार धडक दिल्याने हा दुर्दैवी अपघात घडला. अपघातात पती-पत्नीसह त्यांचा चार वर्षांचा मुलगा ठार झाला. कंटेनरने धडक दिलेल्या अन्य एका दुचाकीवरील दाम्पत्यासह त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
महाकाळा फाट्याजवळ धुळे-सोलापूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. विकास अण्णासाहेब जाधव (वय २८), त्यांची पत्नी साक्षी विकास जाधव (वय २२) आणि मुलगा अर्थव विकास जाधव (वय ४) हे तिघे (रा. रोहीलागड, ता. अंबड, हल्ली मुक्काम शहानगर चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर) होंडा शाईन दुचाकी (एमएच २०, एचसी ३०१३) वरून घरी परतत होते. शहागडवरून वडीगोद्रीकडे जाणाऱ्या कंटेनरने (एनएल ०१, जी ९३२२) दोन्ही दुचाकीला मागून जोरात धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, गाडीसह तिघांना कंटेनरने ५० फूट फरफटत नेऊन कंटेनर दुभाजकावर चढला. तिघेही कंटेनर खाली दबल्याने जागीच ठार झाले आहेत. या भीषण अपघातात विकास, साक्षी आणि अर्थव यांचा जागीच मृत्यू झाला.
नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत साक्षी जाधव ह्या गरोदर होत्या. एका क्षणात एका संपूर्ण कुटुंबावर काळाने घाला घातला. मयत साक्षी जाधव आणि मुलगा अर्थव जाधव यांचे मृतदेह पाचोड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. तिसरे मयत विकास जाधव व दुसऱ्या दुचाकीवरील जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले.
जखमींवर उपचार सुरू
या अपघातातील दुसऱ्या दुचाकीला कंटेनरने धडक दिली. दुचाकी (एमएच १६, सीएल. ९७३७) वरील संतोष बनसोडे (वय २९) आणि त्यांची पत्नी मोनिका संतोष बनसोडे (वय २५) व मुलगा सोहम संतोष बनसोडे (रा. वळदगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वाहतूक ठप्प; पोलिसांची मदत
अपघातानंतर महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांची मोठी रांग लागून वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घटनास्थळी गोंदी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक किरण हवाळे, जमादार रामदास केंद्रे, दीपक भोजने यांनी धाव घेतली. महाकाळा येथील ग्रामस्थांच्या मदतीने कंटेनरखाली अडकलेल्या मृतदेहांना जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी महामार्गावर खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.