दादा गरुडच्या 'त्या' व्हिडिओप्रकरणी मनोज जरांगेंनी केली सखोल चौकशीची मागणी; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 20:17 IST2025-11-10T20:14:57+5:302025-11-10T20:17:02+5:30
'शरद पवारांचा निर्णय चांगला; आम्हाला दुःख होण्याचं काही कारण नाही.'

दादा गरुडच्या 'त्या' व्हिडिओप्रकरणी मनोज जरांगेंनी केली सखोल चौकशीची मागणी; म्हणाले...
वडीगोद्री(जालना): दादा गरुडच्या व्हिडीओने राज्यात खळबळ उडवली आहे. या व्हिडीओमध्ये संतोष देशमुख यांना धनंजय मुंडेंनी 20 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा गरुडने केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी आज केली.
सोमवारी अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले की, दादा गरुडच्या व्हिडीओमध्ये ज्यांची नावे घेतली आहेत, त्यांना चौकशीसाठी बोलावले पाहिजे. या प्रकरणाची संपूर्ण सत्यता शोधली गेली पाहिजे.
जरांगेंचा पोलिसांना इशारा
जरांगे पुढे म्हणाले की, त्या संशयित आरोपीने एका बॉडीगार्डचे नाव घेतले आहे. तो बॉडीगार्ड धनंजय मुंडेंनीच पाठवला होता का, हे पोलिसांनी तपासावे. हे खरे आहे का खोटे, याचा खोलवर तपास झाला पाहिजे. पोलिसांनी घरात शिरून तपास करण्याइतका गंभीरपणे हा विषय हाताळावा. जर माझ्या घातपात प्रकरणातील आरोपी असे काही दावे करत असतील, तर त्याची सत्यता प्रशासनाने नक्की तपासली पाहिजे, असेही जरांगे म्हणाले.
शरद पवार यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मूळ ओबीसींना उमेदवारी द्यावी, असा आदेश राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले की, शरद पवारांचा निर्णय चांगला आहे. त्याने आम्हाला काही दुःख होणार नाही. आमचा उद्देश एकच आहे, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे. आमच्या मुलांना पुन्हा आंदोलन करावे लागू नये, म्हणून आम्ही लढत आहोत.
मराठा समाजाला हक्काचं कुणबी आरक्षण मिळाले पाहिजे
जरांगे पुढे म्हणाले की, आमच्या पोरांनी उच्च शिक्षण घ्यावे, डॉक्टर, इंजिनियर, आयएएस, आयपीएस व्हावे, हेच आमचं स्वप्न आहे. आम्ही कुणाच्या विरोधात नाही. आम्ही फक्त आमच्या हक्काचे कुणबी आरक्षण मिळवण्यासाठी लढतोय. कुणाचा निर्णय झाला तर त्याचं स्वागतच आहे, आम्हाला दुःख होण्याचे काही कारण नाही.