धनगर आरक्षणाचा 'खरा लढा तर आता सुरू झाला'; दीपक बोऱ्हाडेंचा उपोषण मागे घेताना एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 18:11 IST2025-10-03T18:11:09+5:302025-10-03T18:11:38+5:30
दीपक बोऱ्हाडे यांचे १६व्या दिवशी उपोषण मागे; धनगर समाज आजही तितकाच आशावादी

धनगर आरक्षणाचा 'खरा लढा तर आता सुरू झाला'; दीपक बोऱ्हाडेंचा उपोषण मागे घेताना एल्गार
जालना : धनगर समाजाने एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी अनेक आंदोलन, उपोषणे केली, प्रत्येक वेळेस समाजाला आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून समाजाला मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु, त्यांनी नेहमीप्रमाणेच आश्वासन दिले. मी १६व्या दिवशी उपोषण मागे घेत असलो तरी, धनगर समाज एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या बाबतीत आजही तितकाच आशावादी आहे. आत्तापर्यंत आमचा संयम ढळलेला नाही. सरकारच्या तोंडाला काळे फासण्याची वेळ येऊ देऊ नये, अशा भावना दीपक बोऱ्हाडे यांनी गुरुवारी उपोषण मागे घेतांना व्यक्त केल्या.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबावणी व्हावी या मागणीसाठी दीपक बोऱ्हाडे १७ सप्टेंबरपासून जालना येथे आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांनी २४ सप्टेंबरला विराट मोर्चा काढून धनगर समाजाच्या एकीची ताकद दाखवून दिली होती. मोर्चाच्या दोन दिवसानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून एका शिष्टमंडळाने जालना येथे येऊन दीपक बोऱ्हाडे यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र लेखी आश्वासन दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही. असे म्हणत बोऱ्हाडेंनी उपोषण सुरूच ठेवले होते. दरम्यान, बोऱ्हाडे यांच्या सांगण्यावरून एक शिष्टमंडळ मुंबईत जाऊन मुख्यमंत्री यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून परतले. सरकारसोबतची चर्चा फिसकटल्याने बोऱ्हाडे यांच्या आदेशानंतर लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ढोल वाजवून लक्षवेधी आंदोलन केले. बुधवारी १ ऑक्टोबर रोजी राज्यभरात चक्का जाम आंदोलन करून सरकार विरोधात रोष व्यक्त करण्यात आला. अखेर १६व्या दिवशी गुरुवारी दीपक बोऱ्हाडे यांनी त्यांनी मुलगी, आई-वडिलांच्या ज्यूस घेऊन उपोषण मागे घेतले.
लढा सुरूच राहणार : बोऱ्हाडे
आरक्षणाची ही लढाई इथेच थांबली असे कुणीही समजू नये, खरा लढा तर इथेच सुरू झाला आहे. कार्यकर्त्यांनी पुन्हा आरक्षणाच्या मागणीसाठी पेटून उठावे, असे आवाहनही बोऱ्हाडे यांनी केले. यावेळी मराठवाड्यासह इतर जिल्ह्यातील धनगर समाज बांधव उपोषणस्थळी जमा झाले होते.