मराठवाडा-विदर्भाला जोडणारा जालना-खामगाव रेल्वे मार्ग ११५ वर्षांपासून केवळ कागदावरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 16:25 IST2025-12-27T16:20:06+5:302025-12-27T16:25:02+5:30
येत्या अर्थसंकल्पात रेल्वेमार्गासाठी निधीची तरतूद होईल का?

मराठवाडा-विदर्भाला जोडणारा जालना-खामगाव रेल्वे मार्ग ११५ वर्षांपासून केवळ कागदावरच
जालना : मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेला जालना-खामगाव रेल्वे मार्ग आजही केवळ कागदपत्रांच्या आणि बैठकांच्या फेऱ्यात अडकला आहे. ब्रिटिश काळात १९१० मध्ये ज्या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली, त्याकडे जनतेने विकासाचा नवा मार्ग म्हणून पाहिले होते. मात्र, ११५ वर्षे उलटूनही हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरलेला नाही. केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पाची तयारी सुरू झालेली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात तरी जालना ते खामगाव मार्गासाठी भरघोस निधीची तरतूद होईल, अशी आशा आहे.
नुकतीच केंद्रीय मंत्री तथा बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन जालना-खामगाव रेल्वे प्रकल्पावर चर्चा केली. मात्र, या नवीन मार्गाचे प्रत्यक्ष काम कधी सुरू होईल, याची कोणतीही निश्चित वेळ समोर आलेली नाही. दुसरीकडे जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनीही रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली, पण त्यांनाही केवळ आश्वासनांवरच समाधान मानावे लागले आहे.
निधीअभावी प्रकल्प रखडला
मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा जालना-खामगाव रेल्वे मार्ग सध्या अधांतरी आहे. या मार्गाच्या बांधकामासाठी निम्मा खर्च राज्य सरकारला उचलायचा आहे. राज्य सरकारने निधी देण्याची तयारी दर्शवली असली, तरी केंद्र सरकारकडून अद्याप या रेल्वे मार्गासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. परिणामी, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या थंडबस्त्यात पडला आहे. २०२२-२०२३ च्या अर्थसंकल्पात जालना ते खामगाव रेल्वेच्या सर्वेक्षणासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु, काम संथ गतीने सुरू आहे. आणखी निधीची तरतूद झाल्यास हे काम मार्गी लागू शकेल.
इतर मागण्या
परभणी ते छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. यामुळे रेल्वेची संख्या वाढविणे दक्षिण मध्य रेल्वेला शक्य होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि नागपूरकडे जाणाऱ्या रेल्वेची संख्या वाढवावी, परतूर रेल्वे स्थानकावर जलदगती रेल्वेला थांबा द्यावा, बसच्या धर्तीवर मोनोरेल प्रकल्प राबवावा, अशा मागण्या जोर धरत आहेत.
रेल्वे अर्थसंकल्पाची तयारी सुरू झालेली आहे. यामुळे मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. जालना ते खामगाव रेल्वे मार्ग अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात या मार्गासाठी काही प्रमाणात तरतूद करण्यात आली होती. परंतु, हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी निधीची गरज आहे. तसेच, परतूर रेल्वे स्थानकावर सर्व रेल्वे गाड्यांना थांबा द्यावा आणि पश्चिम महाराष्ट्र व नागपूर मार्गावर रेल्वेची संख्या वाढवावी.
- स्वप्नील मंत्री, अध्यक्ष, रेल्वे संघर्ष समिती.