'सरकार चांगले चालायला पाहिजे होते,परंतु..'; दानवेंनी टोपे समोरच सांगितले सेनेतील बंडाचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 16:52 IST2022-06-27T16:50:04+5:302022-06-27T16:52:38+5:30
दोन-तीन दिवसात राज्यात भाजपचे सरकार येईल असा दावा देखील भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला

'सरकार चांगले चालायला पाहिजे होते,परंतु..'; दानवेंनी टोपे समोरच सांगितले सेनेतील बंडाचे कारण
जालना : आम्ही दोन ते तीन दिवसच विरोधी पक्षात असून, लवकरच राज्यात आम्ही सरकार आणू, असे विधान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथे केले. तसेच शिवसेनेच्या आमदारांना विकास निधी मिळत नसल्याने त्यांनी बंड केले, असा दावाही दानवे यांनी यावेळी केला. जालना शहरात कृषी विभाग, अन्न व औषध प्रशासनाच्या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले. यावेळी दानवे बोलत होते.
या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, प्रभारी कृषी अधिकारी भीमराव रणदिवे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमची युती होती. त्याचवेळी आम्ही देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री राहतील, असे सांगितले होते. त्यावेळी कोणीही आक्षेप घेतला नाही. परंतु, निवडणूक झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेससोबत गेली. त्यांनी सरकार स्थापन केले. हे सरकार चांगले चालायला पाहिजे होते. परंतु, आता शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नसल्याने ४० आमदारांनी बंड केले आहे. यात भाजपचा कुठलाही संबंध नाही. आम्ही वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत आहोत. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यात अद्याप कुठलीही बैठक झालेली नाही. फडणवीस हे मुंबईत असून, सांयकाळी ते बैठकीसाठी दिल्लीलाही जाणार असल्याचे सांगून आम्हाला शिंदे गटाचा प्रस्ताव अद्याप आला नाही. आल्यास आम्ही सरकार स्थापन करू, असे राज्यमंत्री दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शिंदे -फडणवीस यांची भेट नाही
एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीसांची भेट झाली नाही. आमच्या बैठका सुरूच असतात. आम्ही बैठका घेतो, राज्याच्या राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. नाराज गटाने आमच्याकडे प्रस्ताव दिला नाही. प्रस्ताव आल्यास पक्षाचे नेते एकत्र बसून ठरवतील. राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही, असे सांगत दानवेंनी अधिक भाष्य करणे टाळले.