मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 16:25 IST2025-08-23T16:24:02+5:302025-08-23T16:25:48+5:30
"आम्ही मुंबईकरांना सांगू इच्छितो की, आम्ही शांततेत येणार आहोत आणि शांततेतच आरक्षण घेणार आहोत. कुणीही आडवा येऊ दे, आम्ही मुंबईत जाणारच.".

मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
- पवन पवार
वडीगोद्री (जालना): मराठा आंदोलक मुंबईत यावेत आणि त्यांच्यात दंगल घडून यावी अशी सरकारचीच इच्छा आहे. सरकारच मराठ्यांच्या अंगावर आग फेकू पाहत आहे, असा गंभीर आरोप मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. शनिवारी अंतरवली सराटी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हा संशय व्यक्त केला.
जरांगे पाटील म्हणाले की, "आम्ही मुंबईकरांना सांगू इच्छितो की, आम्ही शांततेत येणार आहोत आणि शांततेतच आरक्षण घेणार आहोत. कुणीही आडवा येऊ दे, आम्ही मुंबईत जाणारच.". जरांगे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, "जेव्हा आम्ही शांततेत अंतरवलीत बसलो होतो, तेव्हा आम्हाला मारहाण करण्यात आली. आमच्यातच रक्तपात घडवला गेला. येवल्याच्या लोकांना हाताशी धरून आमच्यातच भांडणं लावली गेली, मग दंगल घडवण्याचा संशय आम्हाला का येऊ नये?"
सरकारला दंगल घडवायची आहे
ते पुढे म्हणाले, "मराठ्यांना कळलं आहे की सरकार जाणूनबुजून मराठ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे, त्यामुळेच ते संतप्त झाले आहेत. 'पोलिस बघून घेतील' म्हणजे काय? हा दंगल घडवण्याचा दुसरा प्रयत्न नाही तर काय आहे? आम्ही शांततेत मुंबईला येऊ नये का? आझाद मैदानात बसून उपोषण करू नये का?"
'जाळपोळ करणारे आमचे नाहीत'
जरांगे पाटील यांनी जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. "हे लोक आमच्यात घुसून घोषणा देतील. त्यांचेच लोक देवेंद्र फडणवीस यांना शिव्या देतील. जाळपोळ आणि दगडफेक करणारे आमचे नाहीत. पोलिसांनी त्यांना ताबडतोब पकडावे," असेही जरांगे म्हणाले.
मुंबई न्याय देणारी भूमी
"आम्ही न्यायासाठी मुंबईत येत आहोत. उलट, तुम्ही आम्हाला पाणी दिलं पाहिजे. मुंबई ही न्याय देणारी भूमी आहे," असे जरांगे यांनी सांगितले. "२९ ऑगस्टला आंदोलनाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. गणेशोत्सव आपल्या धर्माचा आहे. आम्ही आमच्या लेकरांच्या कल्याणासाठी मुंबईत येत आहोत. मुंबई ही न्याय देणारी भूमी आहे. गणेशोत्सव आणि आंदोलनाचा काहीही संबंध नाही. आम्ही उत्सवाचा आनंदही घेऊ," असे ते म्हणाले.
सरकारचे लोक काहीही बातम्या पसरवतात
ते म्हणाले की, आम्ही आमचे गणपती बाप्पा तिथेच आणत आहोत आणि मुंबईकर आणि ग्रामीण महाराष्ट्रातील लोक एकत्र येत असल्याने असा सोहळा जगात कधीच होणार नाही. "आम्ही मराठे हिंदूंचे सगळे संस्कार पाळतो आणि वारकरी संप्रदायाचे पालन करतो. गणेशोत्सव आमच्या मुलांच्या सुखासाठी आहे, आणि आरक्षणही मराठ्यांच्या मुलांच्या सुखासाठी आहे. सरकारचे लोक काहीही बातम्या पसरवतात," असेही जरांगे म्हणाले. मुंबईकरांना प्रश्न विचारताना ते म्हणाले, "आमची काय चूक आहे? आम्ही तुमचीच लेकरं आहोत. गरिबांची लेकरं तुमच्या दाराशी येत आहेत." चार महिन्यांपूर्वी जेव्हा मुंबईला जाण्याची तारीख ठरली, तेव्हा गणेशोत्सव आहे, याची कल्पना नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.