२१ तारखेनंतर बदलणार आंदोलनाची दिशा : जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 08:28 IST2024-02-17T08:28:05+5:302024-02-17T08:28:34+5:30
‘सगेसोयरे’ची अंमलबजावणी करा

२१ तारखेनंतर बदलणार आंदोलनाची दिशा : जरांगे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सगेसोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करून अंमलबजावणी केल्याशिवाय आपण थांबणार नाही. २० तारखेपर्यंत हा निर्णय झाला नाही, तर २१ फेब्रुवारीनंतर समाज आंदोलनाची दिशा बदलणार असून, ते आंदोलन तुमच्या हाताबाहेर गेलेले असेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
जरांगे पाटील यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. ज्यांची कुणबी नोंद सापडली त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ज्यांची नोंद सापडली नाही त्यांच्यासाठी सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारून त्यानुसार नोंदी नसलेल्यांना आरक्षण देणार आहेत. नोंदी नसणाऱ्यांना आयोगाच्या अहवालानुसार आरक्षण आम्हाला मान्य नाही. ते आरक्षण ज्यांना हवे आहे, त्यांनी घ्यावे, असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
त्यांना थांबवा, अन्यथा...
नारायण राणे यांच्याबद्दल आदर असल्यामुळे आजवर काही बोललो नाही. पंतप्रधानांना ओबीसींचा स्वाभिमान आहे. मग तुम्हाला का नाही? नीलेश राणे यांना विनंती आहे. त्यांना आता थांबवा. आमच्या भावना समजून घ्या; अन्यथा आता त्यांना खेटण्याची आपली तयारी आहे, असेही जरांगे पाटील म्हणाले.
भुजबळांवर टीका
nसगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी मराठेच नव्हे, तर सर्व ओबीसींसाठी फायद्याची ठरणार आहे. सर्वच जाती-धर्मांच्या मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे.
nहे आमच्या आंदोलनाचे यश आहे; परंतु छगन भुजबळ यांना ते पचत नाही. ते ज्या पक्षात आहेत, त्या पक्षातील लोकांचे त्यांच्यामुळे हाल होणार आहेत, अशी टीकाही जरांगे पाटील यांनी केली