एसीबीचे पथक दिसताच लाचेची रक्कम फेकून पळून जाणारा हवालदार अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 17:52 IST2025-07-12T17:50:50+5:302025-07-12T17:52:57+5:30
जालन्यात चार हजार रुपयांची लाच घेणारा हवालदार जेरबंद

एसीबीचे पथक दिसताच लाचेची रक्कम फेकून पळून जाणारा हवालदार अटकेत
जालना : तक्रारदाराचा जबाब घेण्यासाठी झालेला खर्च आणि तपासात मदत करण्यासाठी म्हणून चार हजार रुपयांची लाच घेणाऱ्या मंठा पोलिस ठाण्यातील हवालदाराविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. ही कारवाई बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मंठा शहरातील तहसील रोड भागात करण्यात आली. राजू परसराम राठोड (वय-४४) असे कारवाई झालेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे.
तक्रारदार आणि त्याच्या गावातील एका व्यक्तीचा १५ जून रोजी वाद झाला होता. या प्रकरणात मंठा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल आहेत. या हाणामारीत तक्रारदार जखमी झाल्याने जालना येथील रुग्णालयात उपचार घेत होते. त्यावेळी हवालदार राठोड हे जबाब घेण्यासाठी खासगी वाहनाने गेले होते. त्या वाहनाचा खर्च १५०० रुपये व तपासात मदत करण्यासाठी ३००० रुपये, अशी ४,५०० रुपयांची लाच राठोड यांनी तक्रारदार यांच्याकडे मागितली होती. या प्रकरणात तक्रारदाराने जालना येथील एसीबीकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर बुधवारी सायंकाळी मंठा शहरातील तहसील रोडवरील हॉटेल समृद्धीसमोर पथकाने सापळा रचला. तक्रारदाराच्या कामासाठी ४,५०० रुपये लाचेची मागणी करून ४००० रुपये स्वीकारल्यानंतर पथकाने कारवाई केली.
पथक पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न
हवालदार राठोड याने लाचलुचपत प्रतिबंधक पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारवाईवेळी ओळखले. त्यावेळी त्याने खिशातील लाचेची रक्कम फेकून दिली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, पथकाने राठोड यास ताब्यात घेतले.