Support for cash-strapped polling stations | गळती असणाऱ्या मतदान केंद्रांना ताडपत्रीचा आधार
गळती असणाऱ्या मतदान केंद्रांना ताडपत्रीचा आधार

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : मतदान प्रक्रियेच्या पूर्वसंध्येला रविवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. पावसामुळे दक्षता म्हणून तालुक्यातील गळक्या मतदान केंद्रांवर ताडपत्री अंथरण्यात आली होती. तर साहित्य वाटपाच्या सभागृहाबाहेर झालेल्या चिखलातूनच वाट शोधत अनेकांना मतदान केंद्र गाठावे लागले.
भोकरदन विधानसभा मतदार संघात ३२२ मतदान केंद्रे आहेत. त्यामध्ये ३१ मतदान केंद्रे ही शहरी भागातील तर २९१ मतदान केंदे्र हे ग्रामीण भागातील आहेत. भोकरदन तालुक्यातील ११ मतदान केंद्रांची दयनीय अवस्था आहे. पाऊस सुरू झाला की, बोरगाव जहागीर, पिंपळगाव रेणुकाई, लेहा, रेलगाव, सिरसगाव मंडप, बाभुळगाव, खामखेडा, बोरगाव तारू, हिसोडा बु, मेरखेडा, डावरगाव, बोरगाव खडक, या अकरा मतदान केंद्रांची गळती थांबविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ताडपत्रीचे आवरणच पूर्ण इमारतीला देण्यात आले आहे. काही ठिकाणी पत्र्याचे छिद्र बुजविण्यासाठी एमसील वापरण्यात आले आहे. मात्र या मतदान केदं्रावर मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी गेलेल्या कर्मचारी व अधिका-याची रात्रीची झोपण्याची मोठी तारांबळ उडाली असल्याची माहिती आहे़
उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शिवकुमार स्वामी यांनी सांगितले की, मतदार संघातील सर्व मतदान केंद्रांवर साहित्यासह अधिकारी व कर्मचारी पोहोचले आहेत. पावसामुळे कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेतली आहे. जवखेडा ठेंगसह इतर काही मतदान केंद्रांवर साहित्य, कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस चिखलात फसली होती. मात्र त्या ठिकाणी तात्काळ दुस-या वाहनाची व्यवस्था करून सर्व मतदान केंद्रांवर साहित्य पोहोचविण्यात आले आहे. मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.


Web Title: Support for cash-strapped polling stations
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.