जालन्यात आस्मानी कहर सुरूच; गोळेगावला 'गोदावरी'चा विळखा, ग्रामस्थांना लोणीत हलविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 18:21 IST2025-09-24T18:19:50+5:302025-09-24T18:21:55+5:30

कोणी पाण्यातून वाट काढली, कोणी ट्रॅक्टरचा आधार घेतला

Storm continues in Jalna; Godavari lashes at Golegaon, villagers left in shock | जालन्यात आस्मानी कहर सुरूच; गोळेगावला 'गोदावरी'चा विळखा, ग्रामस्थांना लोणीत हलविले

जालन्यात आस्मानी कहर सुरूच; गोळेगावला 'गोदावरी'चा विळखा, ग्रामस्थांना लोणीत हलविले

जालना/ परतूर : अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला पूर आल्याने गोळेगाव (ता. परतूर) गावात सोमवारी रात्री पाणी शिरले होते. प्रशासनाने गावातील १३०० वर नागरिकांना सुरक्षितरित्या लोणी गावातील समाज मंदिर, जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित केल्याने अनर्थ टळला. गत २२ दिवसांत सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील अडीच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

जालना जिल्ह्याच्या विविध भागात गत आठवड्यापासून पावसाचा जोर अधिक वाढत आहे. जिल्ह्यात सोमवारी, मंगळवारी पहाटेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. जायकवाडी प्रकल्पातून सोडलेले पाणी आणि पडणारा पाऊस यामुळे गोदावरी नदी दुथडी वाहत आहे. या गोदावरी नदीच्या काठी असणाऱ्या गोळेगाव गावात सोमवारी रात्री अचानक पाणी शिरले. ही माहिती मिळताच नागरिकांनी लेकराबाळांसह गावाबाहेर पडणे सुरू केले. आ. बबनराव लोणीकर, उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड, तहसीलदार प्रतिभा गोरे, गटविकास अधिकारी राजेश तांगडे व इतरांनी गावात धाव घेऊन नागरिकांना एकएक करून गावाबाहेर पडण्यास सांगितले. रात्री उशिरापर्यंत १३०० वर नागरिकांना लोणी गावातील शाळा, समाज मंदिरात हलविण्यात आले. नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथकही नियुक्त करण्यात आले होते. शिवाय अन्नपाण्याची सोयही प्रशासनाकडून करण्यात आली होती. पाणी ओसरल्यानंतर काही नागरिकांनी मंगळवारी सायंकाळी गावात परतत घरातील पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू केले होते.

कोणी पाण्यातून वाट काढली, कोणी ट्रॅक्टरचा आधार घेतला
गावाला अचानक पाण्याचा वेढा पडल्याने एकच गोंधळ उडाला होता. युवकांनी पाण्यातून वाट शोधत लोणी गाव गाठले. तर ज्येष्ठांसह महिला, मुलांना ट्रॅक्टरद्वारे गावाबाहेर काढण्यात आले. अनेकांनी लोणी गावात आसरा घेतला. तर काहींनी पाहुण्याराहुळ्यांकडे जाणे पसंत केले.

प्रशासनाकडून आवश्यक ती मदत
गोळेगाव गावात पाणी शिरल्याची माहिती होताच विविध प्रशासकीय विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गावात धाव घेत ग्रामस्थांना सुरक्षितरित्या गावाबाहेर काढले. त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. शिवाय अन्नपाण्यासह इतर सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड, तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांनी दिली. पाणी ओसरल्यानंतर नुकसानीचे पंचनामे केले जाणार आहेत.

पाच महसूल मंडळात अतिवृष्टी
जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासांत २६.६ मिमी पाऊस झाला असून, पाच महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यात सातोना मंडळात ६७ मिमी, तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव आणि अंतरवली मंडळात प्रत्येकी ८६ मिमी पाऊस झाला आहे. रांजणी महसूल मंडळात १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

१२६ टक्के पाऊस
जिल्ह्यात आजवर वार्षिक सरासरीच्या १२६ टक्के पाऊस झाल्याची नोंद प्रशासकीय दप्तरी झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात १३१.९ मिमी पावसाची नोंद झाली होती.

English summary :
Heavy rains caused Godavari river to flood Golegaon. 1300 residents were safely moved to Loni. Extensive crop damage reported in Jalna.

Web Title: Storm continues in Jalna; Godavari lashes at Golegaon, villagers left in shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.