विहिरीचे खोदकाम करताना क्रेनमधून दगड खाली कोसळले; एका मजुराचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 18:11 IST2019-05-13T18:09:12+5:302019-05-13T18:11:58+5:30
विहीरीतील दगड, डब्बरचे साहित्य क्रेनच्या सहाय्याने काढताना झाली घटना

विहिरीचे खोदकाम करताना क्रेनमधून दगड खाली कोसळले; एका मजुराचा जागीच मृत्यू
राजूर (जालना ) : नविन विहीरीचे खोदकाम करतांना क्रेनच्या साबड्यातून दगड डोक्यात पडून एक मजूर जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना भोकरदन तालुक्यातील ऊंबरखेडा येथे सोमवारी दुपारी घडली.
याविषयी अधिक माहीती अशी की, ऊंबरखेडा शेत शिवारात येथील विठ्ठल सखाराम साळूख यांच्या नविन विहीरीचे खोदकाम सुरु आहे. आज दुपारी विहीरीचे खोदकाम सुरू असतांना विहीरीतील दगड, डब्बरचे साहित्य क्रेनच्या सहाय्याने काढण्याचे काम सुरु असतांना सापड्यातील मोठे दगड विहिरीत काम करत असलेले मजूर लहू रामकिसन फुके (२७, रा.ऊंबरखेडा) यांच्या डोक्यात पडल्याने ते जागीच ठार झाले. तर बाजूला असलेले ज्ञानेश्वर विठ्ठल साळूख हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी साळूख यांना उपचारासाठी जालन्याला हलवण्यात आले. या दुर्घटनेने गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.