चार मिनिटात साडेसहा लाख लंपास; पाठलाग करत पेट्रोलपंप मॅनेजरला बंदुकीच्या धाकावर लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 18:23 IST2022-05-11T18:22:49+5:302022-05-11T18:23:48+5:30
आठवडी बाजाराच्या दिवशी भररस्त्यात अवघ्या चार मिनिटांत लुटीची ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

चार मिनिटात साडेसहा लाख लंपास; पाठलाग करत पेट्रोलपंप मॅनेजरला बंदुकीच्या धाकावर लुटले
कुंभार पिंपळगाव ( जालना) : पेट्रोल पंपाची रक्कम बँकेत जमा करण्यासाठी जात असताना पाठलाग करणाऱ्या चोरट्यांनी भर रस्त्यात मॅनेजरला अडवत बंदुकीच्या धाकावर लुटल्याची घटना आज दुपारी १ वाजेच्या सुमारास लिंबीफाटा येथे घडली. चोरट्यांनी पाळत ठेऊन साडेसहा लाख लुटल्याची ही घटना पेट्रोल पंपापासून निघाल्यानंतर अवध्य चार मिनिटात घडली.
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव ते आष्टी रोडवर लिंबीफाटा येथे हरिभाऊ सोळंके यांचा पेट्रोलपंप आहे. आज कुंभार पिंपळगाव येथील आठवडी बाजार असल्याने या परिसरात वर्दळ होती. दरम्यान, दुपारी एक वाजेच्या सुमारास मॅनेजर सय्यद नईम पेट्रोलपंपचे साडेसहा लाख रुपये बँकेत भरण्यासाठी बाईकवरून निघाले. अवघे अर्धा किलोमीटर दूर जाताच मागावर असलेल्या कारमधून दोघे खाली उतरले. त्यांनी नईम यांना भररस्त्यात अडवत गावठी पिस्तूलाच्या धाकावर रोकड असलेली पिशवी घेऊन परतूरच्या दिशेने पोबारा केला.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, कुंभार पिंपळगाव, उपनिरीक्षक एस मरगळ कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, वर्दळीच्या रस्त्यावर पेट्रोल पंपावरून निघाल्यानंतर अवघ्या चार मिनिटांत लुटीची ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.