मराठा आरक्षणासाठी शेतकऱ्याचे टाॅवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन
By दिपक ढोले | Updated: October 4, 2023 19:28 IST2023-10-04T19:28:58+5:302023-10-04T19:28:58+5:30
मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास याच टाॅवरवर चढून आत्महत्या करण्याचा इशारा

मराठा आरक्षणासाठी शेतकऱ्याचे टाॅवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन
आव्हाना (जालना) : भोकरदन तालुक्यातील गोकुळ येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील पुजारी तुळशीराम श्रीपत शेळके यांनी बुधवारी मराठा आरक्षणासाठी मोबाइल टॉवरवर चढून आंदोलन केले.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या महिनाभरापासून उपोषण करीत आहेत. असे असतानाही शासन मराठा समाजाला आरक्षण देत नाही. यासाठी भोकरदन तालुक्यातील गोकुळ येथील तुळशीराम शेळके यांनी बुधवारी सकाळी आठ वाजता ग्रामपंचायत कार्यालयाजवळ असलेल्या टॉवरवर चढून आंदोलन केले. यावेळी विविध घोषणाबाजी देखील करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास याच टाॅवरवर चढून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. गावातील राजू नारायण शेळके, उपसरपंच स्वप्निल जगन्नाथ शेळके, संजय शेरकर, संजय शेळके, समाधान ठाकरे, एकनाथ शेळके, प्रकाश महाकाळ, उत्तम पालोदे, सरपंच सविता संजय दाभाडे यांनी त्यांची समजूत काढून खाली उतरण्याची विनंती केली. नंतर ते खाली उतरले.
समाजाला आरक्षणाची गरज
मराठा समाजाची आर्थिक स्थिती खराब झालेली आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. आरक्षण न मिळाल्यास माझ्या नातवंडाच्या भविष्याचे काय होईल हाच विचार मनात येत आहे. म्हणून मी आरक्षणासाठी हे आंदोलन केले. सरकारने आरक्षण न दिल्यास मी टॉवरवर चढून आत्महत्या करणार आहे.
- तुळशीराम शेळके, आंदोलनकर्ते