"तुम्ही मुलं जिल्हा परिषद शाळेत पाठवा, आम्ही कर माफ करू"
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 15:58 IST2025-07-03T15:56:48+5:302025-07-03T15:58:39+5:30
भायडी, तळणी, विरेगाव ग्रुप ग्रामपंचायतीचा ठराव

"तुम्ही मुलं जिल्हा परिषद शाळेत पाठवा, आम्ही कर माफ करू"
दानापूर/ पारध (जि. जालना) : जिल्हा परिषद शाळेत मुलांना प्रवेश देणाऱ्या पालकांची घरपट्टी, नळपट्टी माफ करण्याचा निर्णय भायडी, तळणी, विरेगाव (ता. भोकरदन) ग्रुप ग्रामपंचायतीने घेतला आहे. या ग्रामपंचायतीचा हा निर्णय जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
भायडी, तळणी, विरेगाव ग्रुप ग्रामपंचायतीची मासिक बैठक सोमवारी सरपंच रेखा केशव जंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत गाव विकासातील विविध मुद्द्यांसह तिन्ही गावांतील जिल्हा परिषद शाळेत मुलांना प्रवेश देणाऱ्या पालकांची घरपट्टी, नळपट्टी कर माफ करण्याचाही विषय होता. बैठकीत सहभागी ग्रामपंचायत सदस्य संजय पिसे, कलावती पगारे, योगिता दळवी यांनी हा विषय मांडला. उपसरपंच गंगा दसपुते, लता गायके यांनी त्यास अनुमोदन दिले. सदस्या सुनीता सोनवणे, रुख्मण बोर्डे, सांडू निकाळजे, शिवाजी जंजाळ यांनी बहुमतांनी निर्णय पारित करावा, अशी सूचना केली. त्यानुसार सरपंच रेखा जंजाळ यांनी हा ठराव पारित केल्याचे जाहीर केले. यावेळी ग्रामसेवक गजानन तायडे उपस्थित होते. दरम्यान, विरेगाव येथे पहिली ते सातवी, भायडी येथे पहिली ते सातवी व तळणी येथे पहिली ते पाचवीपर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे. भायडी, तळणी आणि विरेगाव ग्रुप ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयामुळे तिन्ही गावांतील जिल्हा परिषदेतील मुलांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक ब्राह्मणे यांच्यासह शिक्षक, पालकांनी स्वागत केले आहे.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा मुलांचे प्रवेश होत नसल्याने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. गोरगरिबांच्या मुलांसाठी जिल्हा परिषद शाळा मोठा आधार आहेत आणि त्या टिकल्या पाहिजेत, मुलांना सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. भविष्यातही शाळेतील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू.
- रेखा जंजाळ, सरपंच
भायडी, तळणी, विरेगाव ग्रुप ग्रामपंचायतीने मुलांचे जिल्हा परिषद शाळेत प्रवेश झाल्यानंतर पालकांना घरपट्टी, नळपट्टी माफ करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. इतर ग्रामपंचायतींनीही असा निर्णय घेतला तर पटसंख्या वाढून बंद पडणाऱ्या शाळांना नवसंजीवनी मिळणार आहे.
- केशव जंजाळ, शिक्षणप्रेमी