'...आत पैसे आहेत का बघा'; शेतशिवारात हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, ग्रामस्थांचा गराडा
By विजय मुंडे | Updated: April 29, 2024 14:11 IST2024-04-29T14:10:25+5:302024-04-29T14:11:06+5:30
हेलिकॉप्टरपासून नागरिकांना दूर सारताना पायलटला चांगलीच कसरत करावी लागली.

'...आत पैसे आहेत का बघा'; शेतशिवारात हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग, ग्रामस्थांचा गराडा
राजूर (जि.जालना) : तांत्रिक बिघाड झाल्यामुळे नागपूरच्या दिशेने जाणारे एक हेलिकॉप्टर सोमवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास तुपेवाडी (ता.बदनापूर) शिवारात लॅण्ड झाले होते. यामुळे घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली.
हेलिकॉप्टरपासून नागरिकांना दूर सारताना पायलटला चांगलीच कसरत करावी लागली. हिंदीभाषिक चालक आणि इतर दोन व्यक्ती आतमध्ये असल्याने निवडणुका आहेत, आतमध्ये पैसे आहेत का अशी शंका उपस्थित करीत प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी लावून धरली होती.
ग्रामीण भागातील नागरिकांना हेलिकॉप्टर, विमान हे केव्हातरी जवळून पाहण्याचा योग येतो. असाच योग सोमवारी तुपेवाडी (ता.बदनापूर) येथील ग्रामस्थांना आला. एक हेलिकॉप्टर सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास तुपेवाडी गावच्या शिवारात लॅण्ड झाले. हेलिकॉप्टर लॅण्ड झाल्याची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली आणि बच्चे कंपनी, ज्येष्ठांसह युवकांनी हेलिकॉप्टरकडे धाव घेतली. अनेकांना हेलिकॉप्टर जवळ उभा राहून सेल्फि घेण्याचा मोह आवरला नाही. हेलिकॉप्टरच्या बाजूने झालेली गर्दी हटविण्यासाठी पायलटच्या नाकी नऊ आले होते.
'निवडणुका आहेत, हेलिकॉप्टरमध्ये पैसे आहेत का बघा...'; इमर्जन्सी लँडिंगनंतर हेलिकॉप्टरला ग्रामस्थांचा गराडा, जालना जिल्ह्यातील घटना pic.twitter.com/jlpw20yIer
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) April 29, 2024
घटनेची माहिती मिळताच हसनाबाद ठाण्याचे सपोनि. संजय अहिरे यांनी सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांना हेलिकॉप्टरपासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या. काही वेळात तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास ते हेलिकॉप्टर मार्गस्थ झाले. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरहून नागपूरच्या दिशेने ते हेलिकॉप्टर जात होते. परंतु, तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते लॅण्ड झाले होते. पायलटने तांत्रिक बिघाड दूर केल्यानंतर हेलिकॉप्टर मार्गस्थ झाल्याचे सपोनि. अहिरे यांनी सांगितले.