समृद्धी महामार्ग बनतोय 'मृत्यूचा मार्ग'! जालना जिल्ह्यात वर्षभरात ६ अपघातांत १४ जणांचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 12:19 IST2026-04-02T12:03:43+5:302026-04-02T12:19:13+5:30
सावधान! समृद्धीवर 'हायवे हिप्नोसिस'चा धोका; जालना जिल्ह्यातील अपघातांच्या आकडेवारीने प्रशासनाचे धाबे दणाणले.

समृद्धी महामार्ग बनतोय 'मृत्यूचा मार्ग'! जालना जिल्ह्यात वर्षभरात ६ अपघातांत १४ जणांचा बळी
जालना : वेगवान प्रवासासाठी ओळखला जाणारा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गजालना जिल्ह्यासाठी गेल्या वर्षभरात मृत्यूचा सापळा ठरत आहे. १ एप्रिल ते ३१ मार्च या वर्षभराच्या कालावधीत जालना जिल्ह्याच्या हद्दीत झालेल्या ६ भीषण अपघातांमध्ये १४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
वेग आणि डुलकीमुळे अपघात
समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या कारणांचा शोध घेतला असता, प्रामुख्याने मानवी चुका आणि तांत्रिक त्रुटी समोर येत आहेत. सरळ आणि गुळगुळीत रस्ता असल्याने वाहनचालकांना वेगाचा मोह आवरत नाही. मात्र, हाच अतिवेग अनेकदा नियंत्रणाबाहेर गेल्याने उलटल्याचे प्रमाण वाढले आहे.
अपघाताची 'पंचसूत्री' : का जाताहेत जीव?
हायवे हिप्नोसिस: तासनतास एकसारख्या रस्त्यावर गाडी चालवल्याने चालकाची एकाग्रता भंग पावते आणि त्याला डुलकी लागते. यालाच तांत्रिक भाषेत 'हायवे हिप्नोसिस' म्हणतात. जालन्यातील अनेक अपघातांत हेच प्रमुख कारण असल्याचे निदर्शनास आले आहे.
टायरची 'एक्स्पायरी': सिमेंटच्या रस्त्यामुळे टायर गरम होऊन फुटण्याचे प्रमाण मोठे आहे. जुने टायर वेगाने धावताना उष्णता सहन करू शकत नाहीत आणि भीषण स्फोट होऊन गाडी पलटी होते.
लेन शिस्तीचा अभाव: महामार्गावर ठराविक लेनमधून गाडी चालवणे बंधनकारक असताना, अनेक चालक अचानक लेन बदलतात किंवा चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करतात.
वन्यप्राण्यांचा अडथळा: महामार्गाच्या कडेला असलेल्या जंगलातून वन्यप्राणी अचानक रस्त्यावर आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून अपघात घडले आहेत.
घरी तुमची कोणीतरी वाट पाहतंय
समृद्धीवरून प्रवास करताना दर दोन तासांनी विश्रांती घ्यावी. टायरमध्ये नायट्रोजन हवेचा वापर करावा आणि वेगमर्यादेचे काटेकोर पालन करावे. समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी आम्ही गस्त वाढवली आहे. मात्र, चालकांनी स्वतःहून शिस्त पाळणे गरजेचे आहे. डुलकी येत असेल तर जबरदस्तीने गाडी चालवू नका, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे.