'समृद्धी' अपघात: ४०० रुपयांच्या रोजंदारीने घेतला आदमाने कुटुंबातील ३ कष्टकरी महिलांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 16:42 IST2026-04-02T16:41:25+5:302026-04-02T16:42:09+5:30

आदमाने कुटुंबावर काळाचा घाला; गावात नियमित रोजगार उपलब्ध नसल्यामुळे ही रक्कमच त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार होती.

Samruddhi Highway accident: 3 hardworking women from the same household killed by a daily wage of Rs. 400 | 'समृद्धी' अपघात: ४०० रुपयांच्या रोजंदारीने घेतला आदमाने कुटुंबातील ३ कष्टकरी महिलांचा बळी

'समृद्धी' अपघात: ४०० रुपयांच्या रोजंदारीने घेतला आदमाने कुटुंबातील ३ कष्टकरी महिलांचा बळी

जालना : तालुक्यातील निधोना येथील आदमाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात कुटुंबातील तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात अलकाबाई दादाराव आदमाने (वय ४५) आणि कांचनबाई प्रकाश आदमाने (वय ५०) या सख्ख्या जावा असून, सुमनबाई कचरू आदमाने (वय ७०) या त्यांच्या चुलत सासू होत्या. या तिघींचीही घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी त्या तीन महिन्यांपासून एकमेकींसोबत समृद्धी महामार्गावर ४०० रुपये रोजंदारीवर साफसफाईचे काम करण्यासाठी जात होत्या.

अलकाबाई आदमाने यांना तीन मुले असून, त्यांचे पती मोलमजुरी करतात. कांचनबाई आदमाने यांना असलेल्या एका मुलाचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले असून, त्या पतीसोबत पत्राच्या शेडमध्ये वास्तव्यास होत्या. त्यांच्या पतीवरही कुटुंबाची जबाबदारी असून, तेदेखील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. सुमनबाई आदमाने यांना तीन मुले असून, तिघेही विवाहित आहेत.

अन् क्षणातच “होत्याचं नव्हतं झालं”
दरम्यान, १ एप्रिल रोजी सायंकाळी समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात या तिघींचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे आदमाने कुटुंबावर काळाने घाला घातला असून, क्षणातच “होत्याचं नव्हतं झालं” अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती. या दुर्घटनेमुळे संपूर्ण निधोना गाव शोकसागरात बुडाले असून, कुटुंबाच्या दु:खात ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.

रोजंदारी कुटुंबासाठी जीवनरेषा
समृद्धी महामार्गावर साफसफाईच्या कामासाठी महिलांना दररोज ४०० रुपयांची रोजंदारी मिळत होती. गावात नियमित रोजगार उपलब्ध नसल्यामुळे ही रक्कमच त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार होती. घरातील खर्च, अन्नधान्य आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्या जीव धोक्यात घालून हे काम करीत होत्या. काम केले तरच पैसे मिळत असल्याने एकही दिवस सुट्टी घेणे त्यांना परवडत नव्हते. मात्र, कामाच्या तुलनेत मिळणारे मानधन कमी असूनही गरिबीमुळे त्यांनी हा पर्याय स्वीकारला होता. हीच रोजंदारी त्यांच्या कुटुंबासाठी जीवनरेषा ठरत होती.

Web Title : समृद्धि दुर्घटना: 400 रुपये की दिहाड़ी ने ली 3 महिलाओं की जान

Web Summary : निधोना की तीन महिलाओं की समृद्धि राजमार्ग दुर्घटना में मौत हो गई। 400 रुपये प्रतिदिन राजमार्ग की सफाई करके, वे परिवार की जीवन रेखा थीं। इस त्रासदी ने गांव को शोक में डुबो दिया, जिससे गरीब परिवारों की दुर्दशा उजागर हुई।

Web Title : Samruddhi Accident: ₹400 Daily Wage Claims Lives of 3 Women

Web Summary : Three women from Nidona died in a Samruddhi Highway accident. Earning ₹400 daily cleaning the highway, they were the family's lifeline. The tragedy has plunged the village into mourning, highlighting the plight of impoverished families.