लग्नघरांना लक्ष्य करणारी टोळी सक्रिय; नांदेड जिल्हा कारागृह अधीक्षकांच्या घरावर दरोडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 16:25 IST2025-05-26T16:21:22+5:302025-05-26T16:25:02+5:30
वाटूर फाट्यावर पुन्हा एकदा दरोडा; मुलाच्या लग्नाच्या दोन दिवसांतच नांदेड जिल्हा कारागृह अधीक्षकाच्या घरी सशस्त्र दरोडा, परिसरात भीतीचे वातावरण

लग्नघरांना लक्ष्य करणारी टोळी सक्रिय; नांदेड जिल्हा कारागृह अधीक्षकांच्या घरावर दरोडा
- अझहर शेख
वाटूर (ता. परतूर, जि. जालना): नांदेड येथील जिल्हा कारागृह अधीक्षक संपत हामु आढे यांच्या वाटूर फाटा येथील घरी २५ मे रोजी पहाटे सशस्त्र दरोड्याची धक्कादायक घटना घडली. पहाटे २. ३० वाजता काही अज्ञात दरोडेखोरांनी आढे यांच्या घरावर हल्ला चढवत नववधूचे दागिने आणि रोकड लंपास केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे, याच परिसरात आठ ते नऊ महिन्यांपूर्वी लग्न समारंभ झाल्यानंतर अशीच एक दरोड्याची घटना घडली होती. यावेळीही, आढे यांच्या मुलाच्या लग्नानंतर दोनच दिवसांत पुन्हा दरोडा पडल्याने या परिसरात लग्नघरांना लक्ष्य करणारी टोळी सक्रिय असल्याची चर्चा सुरू आहे.
संपत आढे हे सध्या नांदेड येथे वास्तव्यास असून, त्यांचा मुलगा सचिन, सून काजल आणि तीन वर्षांचा नातू वेदांत हे वाटूर येथे राहतात. आढे यांच्या धाकट्या मुलाचे दोन दिवसांपूर्वी लग्न झाले आहे. त्यानंतर काही नातेवाईक वाटूर येथे थांबले तर इतर नांदेड येथे गेले. दरम्यान, २५ मे रोजी पहाटे काही दरोडेखोरांनी खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला. घरात इतरत्र लूट केल्यानंतर सचिन यांच्या या बेडरूमचा दरवाजा जोरजोरात ठोठावत "बेटा, दार उघड, अन्यथा.." अशी धमकी दिली. दरोडेखोरांच्या धुमाकूळाने सचिन यांना जाग आली. त्यांनी तत्काळ ११२ वर कॉल करून पोलिसांना संपर्क केला, तसेच नातेवाईकांनाही माहिती दिली. काही वेळाने दरोडेखोर पसार झाले.
नववधूचे दागिने लंपास
घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधीक्षक सुरवसे, उपनिरीक्षक रावते, खंदारे व इतर पोलीस अधिकारी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. घरातील नववधू प्रियांका यांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. सीसीटीव्ही फुटेज व अन्य पुरावे तपासण्यात येत आहेत. मागील दरोड्याशी साम्य शोधण्याचाही प्रयत्न सुरू आहे.
लग्नघरांना लक्ष्य करणारी टोळी
ऑगस्ट-सप्टेंबर 2024 मध्ये याच परिसरात लग्नघरात झालेल्या एका दरोड्यात महिलांना जबर मारहाण करण्यात आली होती. त्या घटनेचा तपास अद्याप अपूर्ण असून, पुन्हा अशा स्वरूपाचा दरोडा पडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लग्न समारंभ करणाऱ्या कुटुंबांमध्ये विशेषतः असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी रात्रगस्त वाढवण्याची मागणी केली आहे.