नातेवाईकांनी मयत महिलेचे पार्थिव नेले पोलीस ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 01:32 IST2020-01-10T01:31:20+5:302020-01-10T01:32:13+5:30
सासरच्या मंडळींनी केलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी पार्थिव परतूर पोलीस ठाण्यात आणले होते.

नातेवाईकांनी मयत महिलेचे पार्थिव नेले पोलीस ठाण्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : सासरच्या मंडळींनी केलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी पार्थिव परतूर पोलीस ठाण्यात आणले होते. ही घटना बुधवारी तालुक्यातील नांद्रा येथे घडली होती. या प्रकरणी सासरच्या चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परतूर तालुक्यातील नांद्रा येथील विवाहिता चंदा विठ्ठल मुजमुले (३२) यांनी बुधवारी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेनंतर मयत महिलेच्या नातेवाईकांनी पार्थिव थेट परतूर पोलीस ठाण्यात नेले. पती विठ्ठल मुजमुले, सासरा प्रल्हाद मुजमुले, सासू जानकाबाई मुजमुले, दीर प्रकाश मुजमुले यांनी संगनमत करून कर्ज फेडण्यासाठी माहेरहून चार लाख रूपये घेऊन ये म्हणून मारहाण करून मानसिक, शारीरिक छळ केला असून, त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लावून धरली होती. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढली. या प्रकरणी मयत महिलेचा भाऊ सतीश आधुडे यांच्या तक्रारीवरून सासरच्या चौघांविरूध्द परतूर ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यानंतर मयत महिलेच्या पार्थिवावर रात्री उशिरा नांद्रा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. तपास सुनील बोडखे हे करीत आहेत.