नागपूरच्या अधिवेशनात गाजणार जालना जिल्ह्यातील प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 12:29 AM2019-12-15T00:29:56+5:302019-12-15T00:30:35+5:30

सोमवारपासून सुरू होणाऱ्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात जालना जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर हे तिन्ही आमदार आवाज उठविणार असल्याचे सांगण्यात आले.

Question in district to attend Nagpur convention | नागपूरच्या अधिवेशनात गाजणार जालना जिल्ह्यातील प्रश्न

नागपूरच्या अधिवेशनात गाजणार जालना जिल्ह्यातील प्रश्न

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : विधानसभा निवडणुका गळ्यात गळे घालून लढलेल्या भाजप- शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून मतभेद झाले. या मतभेदाचे रूपांतर सर्वात जास्त आमदार असताना भाजपला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे. या पक्षाचे जिल्ह्यात तीन आमदार आहेत. त्यामुळे सोमवारपासून सुरू होणाऱ्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात जालना जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर हे तिन्ही आमदार आवाज उठविणार असल्याचे सांगण्यात आले.
जालना जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती या निवडणुकीमुळे कमालीची ढवळून निघाली. लोकसभा पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत शिवसेना- भाजपाने एकत्रित निवडणुका लढवून मते मागितली आणि जिल्ह्यातील मतदारांनी भाजपाला भरभरून मतदानही केले. यामध्ये शिवसेनेचा मात्र दारूण पराभव झाला. हा पराभव झाला असला तरी याच पक्षाचे सर्वेसर्वा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेचा आमदार नसला तरी शिवसेनेचे माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांचे मातोश्रीवरील राजकीय वजन आजही कायम आहे. तर घनसावंगी मतदार संघातून केवळ तीन हजार मतांनी पराभूत झालेले डॉ. हिकमत उढाण हे मातोश्रीच्या गुडबुक मधील नेते म्हणून सर्वत्र परिचित आहेत.
जिल्ह्यात काँग्रेसचे एकमेव आमदार कैलास गोरंट्याल हे असून, ते स्वत:च्या हिंमतीवर निवडून आले आहेत. तर घनसावंगी मतदार संघातून राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांनी आपला गड कायम ठेवला आहे. त्यामुळे नागपूर अधिवेशनात राजेश टोपे आणि कैलास गोरंट्याल हे सत्ताधारी बाकावर बसणार असल्याने विरोधकांची भूमिका ही खºया अर्थाने आता माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे आणि आमदार नारायण कुचे यांना निभवावी लागणार आहे. त्यातच शिवसेनेचे स्थानिक स्वराज्य मतदार संघातील आमदार अंबादास दानवे यांनी प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका घेतल्याचे स्वागतही करण्यात आले.
एकूण राजकीय परिस्थिती पाहता जालना जिल्ह्यातील रस्ते, आरोग्य, पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना हे मुद्दे उपस्थित करणार असल्याचे भाजपच्या या तिन्ही आमदारांनी सांगितले. विशेष करून आमदार बबनराव लोणीकर यांनी मराठवाडा विभागासाठी जी वॉटर ग्रीड योजना मोठ्या कष्टाने मंजूर करून घेतली होती, त्या योजनेला नवीन सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आमदार लोणीकर हे पाण्याचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात उचलून धरणार असल्याचे सांगण्यात आले.
जालना जिल्हा परिषदेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ही महाविकास आघाडी यापूर्वीच कार्यरत होती. २१ डिसेंबर रोजी विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा कार्यकाळ संपणार आहे. त्या दृष्टीने पाचही आमदार हे नागपूर येथे एकत्र येणार असल्याने तेथेच यावर चर्चा होऊन निर्णय होऊ शकतो, असे सांगण्यात येते.
जालना जिल्हा परिषदेत आज घडीला असलेले अध्यक्ष अनिरूध्द खोतकर आणि उपाध्यक्ष सतीश टोपे हे आता पुन्हा आपल्याला उपाध्यक्षपद मिळावे म्हणून तयारी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नवीन वर्षात निवडीची शक्यता
या अध्यक्ष- उपाध्यक्षांच्या निवड प्रक्रियेत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे कुठले पत्ते फेकतात, यावरही बरेच काही अवलंबून आहे. २१ डिसेंबरला मुदत संपत असली तरी या निवडी लांबणीवर पडून त्या नवीन वर्षाच्या पहिल्या पंधरवड्यात होतील, अशीही चर्चा जि.प.वर्तुळात आहे.

Web Title: Question in district to attend Nagpur convention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.