परभणी-छ. संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी निधीची तरतूद, भूसंपादनासाठी अधिसूचना निघेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 20:13 IST2025-08-22T20:13:39+5:302025-08-22T20:13:42+5:30
शासनाने अधिसूचना काढली नसल्याने अद्याप जमीन भूसंपादनाचे काम सुरू होऊ शकलेले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

परभणी-छ. संभाजीनगर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी निधीची तरतूद, भूसंपादनासाठी अधिसूचना निघेना
जालना : बहुचर्चित परभणी ते छत्रपती संभाजीनगररेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी १ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने २ हजार १७९ कोटींच्या निधीस मंजुरी दिली आहे; परंतु जालना जिल्ह्यात अद्याप दुहेरीकरणासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. शासनाने अधिसूचना काढली नसल्याने अद्याप जमीन भूसंपादनाचे काम सुरू होऊ शकलेले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात अंकाई ते परभणी हा रेल्वे मार्ग ‘सिंगल लाइन’ रेल्वे मार्ग होता. अंकाई ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला २०२३ च्या मे महिन्यात मंजुरी देण्यात आली आहे. या मार्गाच्या कामासाठी ९६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सध्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर ते परभणी या १७७.२९ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळावी. यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. १ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी २ हजार १७६ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे.
जमीन संपादनाची प्रक्रिया नाही
परभणी ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या दुहेरीकरणासाठी जालना जिल्ह्यातील चार तालुक्यांतील जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. जालना जिल्ह्यातून सुमारे ७० किलोमीटरचा रेल्वे मार्ग आहे. जालना जिल्ह्यातील जालना, घनसावंगी, परतूर व बदनापूर या तालुक्यांतून रेल्वे मार्ग जातो. या रेल्वे मार्गावर जालना, परतूर, रांजणी, बदनापूर अशी महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत. मागील वर्षी दक्षिण मध्य रेल्वेकडून दुहेरीकरणासाठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली होती. यात जालना, परतूर आणि अंबड येथील उपविभागीय अधिकाऱ्यांवर अधिसूचनेद्वारे भूसंपादनाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. मात्र, नेमकी जमीन कोणती संपादित करायची याविषयीची अधिसूचना अद्याप रेल्वेकडून प्रकाशित करण्यात आलेली नाही. ही अधिसूचना काढल्यानंतरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे.
दुहेरी मार्गासाठी २०२७ उजाडणार
परभणी ते छत्रपती संभाजीनगर हा सिंगल ट्रॅकचा रेल्वे मार्ग आहे. याच ट्रॅकवरून प्रवासी व मालवाहतुकीच्या रेल्वे धावतात. यामुळे या मार्गावर नवीन रेल्वे सुरू करण्यात दक्षिण मध्य रेल्वे उत्सुक नसते. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतर अनेक जलदगती रेल्वेसह गाड्यांची संख्या वाढणार आहे. नांदेड ते परभणी मार्गावरील दुहेरीकरण यापूर्वीच पूर्ण झालेले आहे. आता परभणी ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या १७७.२९ किलोमीटरच्या रेल्वे दुहेरीकरणास मार्गास मंजुरी देण्यात आलेली आहे. हा मार्ग २०२७ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.