'खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पोलिस अटक करत नाहीत'; युवकाचे झाडावर चढून आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 11:43 IST2025-04-12T11:42:39+5:302025-04-12T11:43:06+5:30
पोलिसांवर आरोप करीत युवक चढला झाडावर

'खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पोलिस अटक करत नाहीत'; युवकाचे झाडावर चढून आंदोलन
जालना: खुनातील गुन्ह्यात असलेल्या आरोपींना अंबड पोलिस अटक करत नाहीत, असा आरोप करीत एक युवक झाडावर चढून बसल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. ही घटना शनिवारी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास जालना शहरातील मोतीबाग परिसरात घडली.
सुखदेव चंद पाटील (रा. गवळवाडी मांडवा) असे झाडावर चढलेल्या युवकाचे नाव आहे. कल्याण बापूराव कोलते (अंबड) यांच्या मृत्यू प्रकरणात अंबड पोलिसात गुन्हा दाखल आहे. परंतु अंबड पोलिस या गुन्ह्यातील आरोपीस अटक करीत नसल्याचा आरोप सुखदेव चंद यांनी केला आहे. यावेळी फौजदार सचिन सानप, फौजदार, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, रवींद्र देशमुख यांच्यासह इतरांनी चंद पाटील यांच्याशी संवाद साधत झाडाखाली उतरण्याची विनंती केली. यावेळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. सकाळी ९ वाजेनंतरही पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान त्या युवकास खाली घेण्यासाठी प्रयत्न करीत होते.
दरम्यान, सकाळी ११ वाजता या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येईल. तपासानंतर सर्व संशयितांना अटक करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले. त्यानंतर तब्बल चार तासानंतर युवक खाली उतरला आणि यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला.