आधार कार्ड बनवून बँकेत उघडले खाते, बांगलादेशात पाठवायचा पैसे; भोकरदनमध्ये तीन घुसखोर ATSच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 20:30 IST2024-12-28T20:29:35+5:302024-12-28T20:30:35+5:30

भोकरदन तालुक्यातील कुंभारी व अन्वा येथे पकडलेल्या तिन्ही बंगलादेशीना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील एकजण मागील 8 वर्षांपासून कुंभारीत राहत असल्याचे समोर आले आहे. 

Opened a bank account by making Aadhaar card, sent money to Bangladesh; Three infiltrators caught by ATS in Bhokardan | आधार कार्ड बनवून बँकेत उघडले खाते, बांगलादेशात पाठवायचा पैसे; भोकरदनमध्ये तीन घुसखोर ATSच्या जाळ्यात

आधार कार्ड बनवून बँकेत उघडले खाते, बांगलादेशात पाठवायचा पैसे; भोकरदनमध्ये तीन घुसखोर ATSच्या जाळ्यात

भोकरदन (जालना): भोकरनद तालुक्यातील अन्वा  व कुंभारी येथून एका स्टोन क्रेशरवर कामाला असलेल्या तिघांना दहशतवाद विरोधी पथकाने शुक्रवारी (27 डिसेंबर) दुपारी ताब्यात घेतण्यात आले होते. त्यानंतर पारध पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली होती. हे तिघेही बांगलादेशी नागरिक असल्याचे चौकशीतून समोर आले असून, त्यांना न्यायालयाने 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

एटीएस अर्थात दहशतवाद विरोधी पथकाच्या नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथील टीमने संयुक्तपणे ही कारवाई करून तीन जणांना अटक केली. तिघेही बांगलादेशी नागरिक असल्याचे आणि अवैधपणे राहत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर एटीएसने ही कारवाई केली.

सुरुवातीला त्यांनी या तिघांच्या शोधासाठी जळगाव गाठले होते. नंतर त्यांना हे तिघे भोकरदन तालुक्यात असल्याचे समजले. पारध पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकाला मदत केली. तिघेही आरोपी भोकरदन तालुक्यातील अन्वा व कुंभारी येथील स्टोन क्रेशरवर काम करत होते. ते कामानिमित्त कधी अन्वा तर कधी कुंभारी येथे राहत असत. 

अटक केलेल्या आरोपींची नावे काय?

अटक केलेले आरोपी  हुमायुन कबीर अली अहमद (वय ४० वर्ष, मूळ रा. काबील मियारबाडी, बिरनारायणपूर, तहसील काजीरखील जि. नोवाखली), मानीक खान जन्नोदीन खान (वय ४२ वर्ष, मूळ रा. बेपारी मुन्शी कंदी, तहसील- चारचांदा जि. शौकीपूर) व इमदाद हुसेन मोहम्मद ऊली अहमद अशी तिघांची नावे आहेत. 

तिघेही बांगलादेशी नागरिक असून बेरोजगारीला कंटाळून कोणत्याही घुसखोरी करून ते भारतात आले असल्याचे त्यांनी पोलीस चौकशीत सांगितले.

अहिल्यानगरमधील कारवाईत कळाली तिघांची माहिती

अहिल्यानगर येथून पळालेले दोघे सखे भाऊ कुंभारी येथील माणिक खान जनोद्दीन खान यांच्याकडे आश्रयाला आल्यामुळे हा प्रकार उघड झाला. बांगलादेशातील काही नागरिक अहिल्यानगर येथे असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यामुळे त्यांनी अहिल्यानगर येथे कारवाई केली. यादरम्यान इमदाद हुसेन मोहमद अली उमद व त्याचा भाऊ हुमायून कबीर मोहंमद उली अहमद हे दोघे याठिकाहून पळून जाण्यात यशस्वी झाले होते. 

हे दोघे जळगाव मार्गे भोकरदनकडे आले. त्यानंतर कुंभारी येथे गेल्या आठ वर्षांपासून अवैधपणे वास्तव्यास असलेल्या माणिक जैनुल्लहुसेन खान यांच्याकडे आले. त्याने या दोघांना आश्रय दिला मात्र पोलीस आपला पाठलाग करीत आहेत हे त्यांना माहीत नव्हते.

मात्र या नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथील दहशदवाद विरोधी पथकांच्या टीमने पारध पोलिसांच्या मदतीने या तिघांनाही पकडले व त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली यासाठी नाशिक व छत्रपती संभाजीनगर दहशतव विरोधी पथकाचे सपोनि राहुल रोडे, सुखदेव मुरकुटे, पारध पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष माने, प्रताप गिरी, शिवाजी भगत, गणेश निकम, अमोल देशमुख, संतोष जाधव, राहुल चव्हाण, युनुस मुजेवार, गजानन इंगळे यांचा शोध मोहिमेत समावेश होता. 

भोकरदन येथील भारतीय स्टेट बँकेत खाते

यातील माणिक जैनउल्ला हुसेन खान याने कुंभारी ग्रामपंचायतचे प्रमाणपत्र वापरून व बनावट आधार कार्ड तयार करून भोकरदन येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत खाते उघडले. या खात्यावरून त्याने बांगलादेशात पैसे पाठविल्याची माहिती आहे. हा इसम 2008 मध्ये अवैध मार्गाने घुसखोरी करून भारतात आला होता. 

सुरुवातीला अहिल्यानगर येथे राहिला व त्यानंतर एका एजन्सीच्या कामानिमित्ताने भोकरदन तालुक्यात आला व त्यानंतर झालेल्या ओळखीतून कुंभारी येथील स्टोन क्रेशरवर काम करू लागला. त्याने तब्बल 8 वर्षांपासून कुंभारी येथे वास्तव्य केले आहे. शिवाय तो 2022 मध्ये बांगलादेशात गेला व परत कुंभारी येथे आला होता. भारत व बांगलादेश सीमा पार करून देण्यासाठी एजंट आहेत, त्यांना 15 हजार रुपये दिले ते सोडतात, असे या तिघांनी पोलिसांना सांगितले.

Web Title: Opened a bank account by making Aadhaar card, sent money to Bangladesh; Three infiltrators caught by ATS in Bhokardan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.