ट्रकच्या धडकेत एक जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:55 IST2018-12-31T00:55:17+5:302018-12-31T00:55:30+5:30
उभ्या असलेल्या हायवावर मागून जोरात दुचाकी धडकली. या धडकेत टेंभुर्णीचा युवक जागीच ठार झाला.

ट्रकच्या धडकेत एक जण ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना/टेंभूर्णी : शहरातील जिल्हा सत्र न्यायालयासमोर उभ्या असलेल्या हायवावर मागून जोरात दुचाकी धडकली. या धडकेत टेंभुर्णीचा युवक जागीच ठार झाला. तर दोन जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. हा अपघात शनिवारी रात्री १ वाजेच्या सुमारास घडला. डॉ. दीपक दादाराव मुनेमाणिक (२८, टेंभुर्णी, ता.जाफराबाद ) असे मयताचे नाव आहे. तर शैलेस आमले (२६, टेंभुर्णी), अमरदीप हनुमंते (२४, रा. नांदेड) अशी जखमींची नावे आहेत.
औद्योगिक वसाहतीत असलेल्या स्टील कारखान्यातील लोहयुक्त कच मंठा रोडवरील दुसऱ्या कारखान्यात खाली करुन औद्योगिक वसाहतीकडे परत जाणारा हायवा ट्रकचे (एम.एच.२१, एक्स २५२) जिल्हा सत्र न्यायालयासमोर टायर पंक्चर झाल्याने रात्री एकच्या सुमारास उभा होता. यावेळी दीपक हा त्यांच्या दोन साथीदारांसोबत दुचाकीवर (एमएच.२६ डब्ल्यू ९९१३) मोतीबागेच्या दिशेने जात असतांना अंधारात अंदाज न आल्याने समोर उभ्या असलेल्या हायवा ट्रकवर आदळली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दीपक मुनेमाणिक यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तो जागीच ठार झाला. याबाबत
रविवारी रात्री उशिरापर्यंत जबाब
नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, दीपकच्या पार्थिवावर
शोकाकुल वातावरणात रविवारी दुपारी टेंभुर्णी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, चार बहिणी, आजी, काका, काकू असा मोठा परिवार आहे.
आई - वडिलांचे स्वप्न
राहिले अपूर्ण
दीपकला लहानपणापासूनच डॉक्टर होण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी बी.ए.एम.एस. चे शिक्षण पूर्ण केले होते. सध्या तो कोल्हापूर येथे एम. एस. च्या द्वितीय वर्षात शिकत होता. त्याने आपल्या गावात रूग्णसेवा करावी, अशी इच्छा त्याच्या आई-वडिलांची होती. परंतू, त्याच्या जाण्याने कुटुंबाचा एकुलता एक आधार असलेल्या दीपकच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
विवाहाचे स्वप्नही चक्काचूर
दीपकचे शिक्षण पूर्ण झाले की, त्याचे लग्न करुन घरात सूनबाई आणण्याचे स्वप्न त्याचे आई-वडील रंगवित होते. अनेक ठिकाणची चांगली स्थळेही दीपकला येत होती. मुलाने डॉक्टर होऊन गरीब रुग्ण बांधवांंची सेवा करावी व आपण सून- नातवंडांची स्वप्न पाहत मस्त जगावे अशी आशा असतानाच नियतीने क्षणात होत्याचे नव्हते करून टाकले.