खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात होऊन गोलापांगरी येथे एकजण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 15:38 IST2018-12-01T15:37:31+5:302018-12-01T15:38:45+5:30
दतात्रय बापुराव वायाळ (४०) असे मृताचे नाव असून आज सकाळी तालुक्यातील गोलापांगरी येथे ही घटना घडली.

खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात होऊन गोलापांगरी येथे एकजण ठार
जालना : खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरुन पडल्यानंतर पाठीमागून येणारा ट्रक डोक्यावरुन गेल्याने एकजण जागीच ठार झाला. दतात्रय बापुराव वायाळ (४०) असे मृताचे नाव असून आज सकाळी तालुक्यातील गोलापांगरी येथे ही घटना घडली.
आज सकाळी मंठा तालुक्यातील बदु्रक पांगरी येथील रहिवासी दतात्रय वायाळ हे दुचाकीने (क्रमांक एम. एच. २८ ए. वाय. ६७४१) गोलापांगरी मार्ग अंबड कडे निघाले होते. गोलापांगरी ते अंबड रस्त्याची खड्यामुळे दुरवस्था झाली आहे. मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होते. येथेच खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वायाळ यांची दुचाकी घसरल्याने ते रस्त्यावर पडले. याच दरम्यान, पाठीमागून सुसाट येत असलेला कांद्याचा एक ट्रक ( क्रमांक एम.एच. १८ बी.ए.७९८८ ) त्यांच्या डोक्यावरुन गेला. यात गंभीर जखमी होऊन वायाळ जागीच गतप्राण झाले. विशेष म्हणणे वायाळ यांनी हेल्मेट घातले होते. मात्र ट्रक डोक्यावरुन गेल्याने हेल्मेटचा चुराडा झाला. अपघातानंतर चालकाने ट्रक रस्त्यावर सोडून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक निबाबासाहेब बोरसे, सहायक पोलीस निरीक्षक के. एस. नाडे ,बी. एन. ढाकणे यांच्या पथकांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.ट्रक जप्त केला.