One injured in firing | वरातीत केलेल्या गोळीबारात एक जखमी
वरातीत केलेल्या गोळीबारात एक जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : तालुक्यातील मौजे गवळीवाडा येथे नवरदेवाच्या वरातीत गावठी कट्ट्यातून गोळी सुटल्याने नवरदेवाचा मोठा भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना जालना तालुक्यातील मौजे गवळीवाडी येथे बुधवारी रात्री घडली. यामुळे लग्न वरातीत एकच खळबळ उडाली होती.
निधोना येथील सागर तुकाराम शहापूरकर यांचा मांडवा येथील युवतीशी विवाह जुळला होता. २७ मार्च रोजी मांडवा येथे रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गावातील मारोती मंदीरापासून नवरदेवाची वरात डीजेच्या तालावर लग्नमंडपाकडे निघाली होती. यात नवरदेवाची मित्रमंडळी, नातेवाईकांनी डीजेच्या तालावर ठेका घेतला होता. अशातच नवरदेवाचा नातेवाईक गजानन तौर याने हवेत गोळीबार केला. त्यातील एक गोळी नवरदेवाचा मोठा भाऊ किरण शहापूरकर यांच्या कमरेच्या वरच्या बाजूला लागून ते गंभीर जखमी झाल्याने वरातीमध्ये एकच धावाधाव झाली. नवरदेवाच्या नातेवाईकांनी जखमी किरण शहापूरकर यास तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले. गावात लग्नाच्या वरातीत गोळी लागून एक जण जखमी झाल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली याची माहिती ग्रामस्थांनी चंदनझिरा पोलिसांना दिली. माहिती मिळताच चंदनझिरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक कौठाळे यांनी भेट देऊन पंचनामा केला. पोहेकॉ अनिल काळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल आहे. यात गजानन तौर आणि गोरख पंगळूवाले यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
लग्नाच्या वरातीत गोळीबार करुन दोघे जण गंभीर जखमी झाल्याची जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. १० मार्च रोजी घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथे मुलाच्या लग्नात माजी सैनिकाने हवेत गोळीबार केल्याने एक जण गंभीर जखमी झाला होता. माजी सैनिकाविरुध्द गोंदी पोलिसांत गुन्ह्याची नोंद आहे. सतरा दिवसानंतर जालना तालुक्यातील गवळीवाडी येथे गोळी सुटून जखमी झाल्याची दुसरी घटना आहे. यातील आरोपीचा अद्यापही शोध लागलेला नाही.


Web Title: One injured in firing
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.