Officers, employees shake laziness - Waghmare | अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आळस झटकावा- वाघमारे
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आळस झटकावा- वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्ह्यात गेल्या दोन तीन वर्षापासून कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन दुष्काळ निवारणार्थ प्रभावीरीत्या उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव तथा जालना जिल्ह्याचे पालक सचिव दिनेश वाघमारे यांनी सोमवारी येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ निवारण उपयोजनाबाबतची आढावा बैठक पालक सचिव दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी निर्देशित केले. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी , आरोग्य, सिंचन, जिल्हा परिषद, निबंधक कार्यालय व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालक सचिव दिनेश वाघमारे यांनी राज्यातील विविध भागात दोन तीन वर्षांपासून कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळ, पाणीटंचाईच्या समस्येचा यशस्वीरित्या सामना करण्याकरिता शासन विविध स्तरांवर सक्रिय प्रयत्न करत आहे. दुष्काळाच्या निवारणार्थ वेगवेगळ्या विभागांमार्फत प्रभावीरीत्या उपयुक्त योजनांची अंमलबजावणी करुन या परिस्थितीतून बाहेर पडणे शक्य आहे. जालना जिल्ह्यात जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा परिषद इतर यंत्रणांच्या सोबतीने चांगले काम करत असल्याचे नमूद करुन वाघमारे यांनी दुष्काळ निवारणाच्या कामांचा वेग व व्यापकता वाढविणे येत्या काळात गरजेचे आहे. त्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत विविध निर्देश वाघमारे यांनी यावेळी दिले.
जालना जिल्ह्यात ग्रामीण व नागरी भागात पाणीटंचाई निवारणार्थ ५२८ गावे व १२२ वाड्यांमध्ये ६७० टँकर सुरू असून ७८५ गावांमध्ये ६९७ टँकरसाठी व टॅकर व्यतिरिक्त विहिर अधिग्रहण केलेल्या आहेत. जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागात टँकरच्या एक हजार ६२७ फेºया मंजूर आहेत नळ योजनांची दुरूस्तीची १९४ कामे पूर्ण झाली आहेत.
जिल्ह्यामध्ये पशुधनामध्ये मोठी जनावरे तीन लाख १२७ तर ,लहान जनावरांची संख्या तीन लाख २२ हजार असे एकूण सात लाख पशुधन आहे. जिल्ह्यात मंजूर चारा छावण्याची संख्या ४८ असून ३२ चारा छावण्या सुरु झालेल्या आहेत. त्यामध्ये १८ हजारपेक्षा अधिक जनावरे आहेत. रोजगार हमी योजने अंतर्गत ८४७ कामांवर २७ हजार ७८६ मजुरांची उपस्थिती आहे.


Web Title: Officers, employees shake laziness - Waghmare
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.