जालना जिल्ह्यात सात सावकरांवर उपनिबंधक कार्यालयाची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 12:33 IST2020-03-06T12:32:12+5:302020-03-06T12:33:46+5:30
परतूर येथील २, उमरखेडा येथील ४ व केदारखेडा येथील एका सावकाराविरूध्द कारवाई

जालना जिल्ह्यात सात सावकरांवर उपनिबंधक कार्यालयाची धाड
जालना : येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने भोकरदन तालुक्यातील केदारखेडा, उमरखेडा व परतूर येथील सात सावकरांवर शुक्रवारी सकाळी कारवाई करण्यात आली आहे.
सावकार पीडित शेतकऱ्यांनी जालना येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सावकारीबाबत तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीनुसार जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सकाळीच परतूर येथील २, उमरखेडा येथील ४ व केदारखेडा येथील एका सावकाराविरूध्द तीन पथकांनी कारवाई केली.
केदारखेडा येथे भोकरदनचे सहायक निबंधक श्रीराम सोन्ने यांच्या नेतृत्वाखालील टीमने, उमरखेडा येथे जालना येथील सहायक निबंधक परमेश्वर वरखडे यांच्या टीमने तर परतूर येथे परतूरचे सहायक निबंधक प्रणव वाघमारे यांच्या टीमने ही कारवाई केली. या कारवाईत सावकारीतील विविध प्रकारची कागदपत्रे हाती लागले असून, कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.