जालना : ओबीसी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते, ज्येष्ठ समाजसेवक आणि ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांचे रविवारी दुपारी १२:३० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने सामाजिक न्यायाच्या लढ्यातील एक समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले.
शब्बीर अन्सारी हे जालना शहरातील रेल्वे गेटजवळील नूतन वसाहत येथे वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सहा मुली आणि मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रात्री ९ वाजता ईशा नमाजानंतर सय्यद अहमद शेर सवार दर्गा येथे नमाज-ए-जनाजा अदा करण्यात आली. त्यानंतर जवळील कब्रस्तानमध्ये दफनविधी पार पडला.
शब्बीर अहमद अन्सारी यांनी आपली चार दशकांहून अधिक काळची कारकिर्द इतर मागासवर्गीयांच्या हक्क आणि कल्याणासाठी वेचली. मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी आणि मुस्लीम समाजातील मागास घटकांना ओबीसी प्रवर्गात न्याय मिळावा, यासाठी त्यांनी देशपातळीवर मोठे संघटन उभे केले होते. विशेष म्हणजे, ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्यासोबत त्यांनी ओबीसींच्या विविध प्रश्नांवर देशपातळीवर अनेक बैठका घेतल्या होत्या.
५० हून अधिक शासननिर्णयांत योगदानशब्बीर अन्सारी यांच्या पाठपुराव्यांमुळे शिक्षण, रोजगार आणि राजकीय प्रतिनिधित्व या विषयांवरील ओबीसींच्या समस्या निकाली काढण्यासाठी शासनाने ५०हून अधिक महत्त्वपूर्ण निर्णय जारी केले. तळागाळांतील लोकांशी थेट नाळ जोडलेले नेते म्हणून त्यांची ओळख होती. गुंतागुंतीचे प्रश्न सोप्या भाषेत मांडण्याच्या त्यांच्या शैलीमुळे ते केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातील ओबीसी नेत्यांमध्ये आदराचे स्थान राखून होते.
ओबीसी चळवळीचा बुलंद आवाज हरपलाशब्बीर अहमद अन्सारी यांच्या निधनाने ओबीसी चळवळीचा बुलंद आवाज हरपला आहे. ते केवळ माझे सहकारी नव्हते, तर अनेक दशकांचे विश्वासू सोबती होते. मंडल आयोगाची अंमलबजावणी आणि मुस्लीम ओबीसींना आरक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी दिलेले ऐतिहासिक योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने समता परिषदेची आणि माझी वैयक्तिक मोठी हानी झाली आहे.- छगन भुजबळ, मंत्री, ओबीसी नेते
भक्कम आधारवड कोसळलाशब्बीर अन्सारी यांनी पस्मांदा आणि मुस्लीम ओबीसी समाजाला केवळ आरक्षणाचे हक्कच मिळवून दिले नाहीत, तर शिक्षणाची द्वारेही उघडली. लोहियावादी विचारांचा हा नेता आयुष्यभर पत्र्याच्या घरात राहिला, पण हजारो मुलांचे भविष्य उजळले. राजकारण्यांना बळ देणाऱ्या या योद्ध्याला योग्य सन्मान मिळाला नाही, ही खंत अस्वस्थ करणारी आहे. महाराष्ट्रातील ओबीसी चळवळीचा एक भक्कम आधारवड कोसळला आहे.- कपिल पाटील, माजी आमदार, समाजवादी नेते
Web Summary : Shabir Ansari, a prominent OBC leader and social worker, passed away at 79. He dedicated his life to the rights of backward classes, advocating for the implementation of the Mandal Commission and Muslim OBC inclusion. His work led to over 50 government decisions benefiting education, employment and political representation.
Web Summary : ओबीसी नेता और समाजसेवी शब्बीर अंसारी, 79 वर्ष की आयु में निधन हो गया। उन्होंने पिछड़े वर्गों के अधिकारों के लिए जीवन समर्पित किया, मंडल आयोग के कार्यान्वयन और मुस्लिम ओबीसी समावेशन की वकालत की। उनके काम से शिक्षा, रोजगार और राजनीतिक प्रतिनिधित्व को लाभ हुआ।