मातीच्या ढिगाराखाली दबून वीटभट्टी मजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 19:05 IST2019-03-28T19:04:08+5:302019-03-28T19:05:49+5:30
कुरण नदीपात्रातील घटना

मातीच्या ढिगाराखाली दबून वीटभट्टी मजुराचा मृत्यू
शहागड (जालना ) : विटा तयार करण्यासाठी नदी पात्रातील माती कोरताना डगर कोसळल्याने त्याखाली दबून मजुराचा मृत्यू झाला. राजू हरी केसरे असे मृत मजुराचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि. २७ ) सायंकाळी कुरण (ता. अंबड) येथील गोदापात्रात घडली.
काशीनाथ लक्ष्मण तिळे (रा. ढोंडराई ता. गेवराई) यांच्या कुरण येथील वीट भट्टीवरील कामगार राजू हरी केसरे (वय- ३६, रा. गंधारी गायरान, ता. अंबड) बुधवारी सायंकाळी विटा बनविण्यासाठी कुरण (ता. अंबड) येथील गोदापात्रात माती कोरत होते. दरम्यान डगरीचा वरचा भाग अचानक कोसळला. ढिगाऱ्याखाली राजू दबले गेले. यात त्यांचा गुदमरून जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक फौजदार सय्यद नासिर करत आहेत. त्यांच्या पश्चात आई- वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे.