दहावीच्या विद्यार्थ्यांना महाज्योतीकडून नीट-सीईटी परीक्षेचे प्रशिक्षण, अभ्यासासाठी टॅब देणार
By महेश गायकवाड | Updated: March 14, 2023 16:15 IST2023-03-14T16:15:18+5:302023-03-14T16:15:46+5:30
सध्या दहावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही याेजना असून, यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांना महाज्योतीकडून नीट-सीईटी परीक्षेचे प्रशिक्षण, अभ्यासासाठी टॅब देणार
जालना : राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती-जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील शिक्षणासाठी महत्त्वाच्या नीट, सीईटी परीक्षेचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शासनाच्या महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅब सोबत इंटरनेट सुविधाही पुरविण्यात येणार आहे.
सध्या दहावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही याेजना असून, यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत या प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांना नीट, सीईटी परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण व या परीक्षेच्या अभ्यासासाठी मोफत टॅब महाज्योती संस्थेकडून देण्यात येणार आहे. तसेच त्याच्या वापरासाठी एका दिवसाला सहा जीबी इंटरनेट पुरविण्यात येणार आहे.
कोणाला करता येणार अर्ज ?
ही योजना इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती-जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे. जे विद्यार्थी सध्या दहावीची परीक्षा देत आहेत, त्यांना यासाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज भरण्यासाठी नववी परीक्षेचे गुणपत्रक, दहावी परीक्षेचे हॉलतिकीट आवश्यक आहे.
घरबसल्या करा अर्ज
या प्रशिक्षण वर्गासाठी महाज्योती संस्थेच्या https://mahajyoti.org.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येतो. यासाठी आवश्यक कागदपत्रे आपल्याकडे असणे गरजेचे आहे.
ही कागदपत्रे आवश्यक
या प्रशिक्षण वर्गासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे नववी परीक्षेचे गुणपत्रक, दहावी परीक्षेचे हॉलतिकीट, रहिवासी दाखला, आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र व नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच दहावी परीक्षेचा निकाल लागल्यावर महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला, नीट, सीईटी परीक्षेची तयारी करत असल्याचे हमीपत्र विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहे.