सहा वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न, दारुच्या नशेतील आरोपी अटकेत

By दिपक ढोले  | Updated: March 22, 2023 16:09 IST2023-03-22T16:08:41+5:302023-03-22T16:09:28+5:30

श्रीराज गोरे (६) हा मुलगा मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घरासमोर खेळत होता

Kidnapping attempt of six-year-old boy: Accused arrested in jalana | सहा वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न, दारुच्या नशेतील आरोपी अटकेत

सहा वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न, दारुच्या नशेतील आरोपी अटकेत

दीपक ढोले

जालना : घरासमोरून सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना परतूर तालुक्यातील लोणी येथे मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. गणेश उर्फ बाळू जगन्नाथ डोके (रा. माजलगाव, जि. बीड) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. दरम्यान, त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. लोणी येथील राजेंद्र धोंडीराम गोरे हे आष्टी जेट्स पार्लर चालवितात. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे.

श्रीराज गोरे (६) हा मुलगा मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घरासमोर खेळत होता. त्याचवेळी संशयित गणेश उर्फ बाळू जगनाथ डोके हा तेथे आला. तो मुलाला गाडीवर बसवून घेऊन जात होता. परंतु, गावापासून काही अंतरावर गेल्यावर त्याची दुचाकी स्लीप झाली. नागरिकांनी तातडीने धाव घेतली. त्याचवेळी ग्रामस्थांनी श्रीराज याला नाव विचारले. त्याने श्रीराज राजेंद्र गोरे असे सांगितले. हे माझे कोणी नाही, मला त्यांनी गाडीवर बसून आणल्याचे त्याने सांगितले. याची माहिती राजेंद्र गोरे यांना देण्यात आली. ते तातडीने घटनास्थळी गेले. नंतर गणेश डोके हा मुलाचे अपहरण करीत असल्याचे त्यांना समजले. संशयिताला घेऊन त्यांनी आष्टी पोलिस ठाणे गाठले. संशयिताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ नरके यांनी सांगितले.

Web Title: Kidnapping attempt of six-year-old boy: Accused arrested in jalana