अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला; ८६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 07:53 PM2020-10-20T19:53:23+5:302020-10-20T19:54:36+5:30

जालना तालुक्यातील एक लाख शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा 

The kharif season was wasted due to heavy rains; Crop damage on 86 thousand hectares | अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला; ८६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान 

अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला; ८६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान 

Next
ठळक मुद्दे तालुक्यात ९१ हजार ४२३ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली.

जालना : मागील दोन महिन्यांपासून तालुक्यात सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. १ लाख ६०० हजार ३२० शेतकऱ्यांची ८६ हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत. शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. 

सततच्या दुष्काळानंतर यंदा जूनच्या सुरूवातीलाच जोरदार पाऊस झाला. चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी व लागवड उरकली. तालुक्यात ९१ हजार ४२३ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. सतत पाऊस पडत राहिल्याने पिकेही जोमात आली. ऐन मूग व उडिद काढणीला आला अन् तालुक्यात जोरदार पाऊस झाला. सतत दहा ते अकरा दिवस पाऊस झाल्याने मूग व उडिदाच्या शेंगांना कोंब फुटले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता.

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी महसूल व कृषी विभागास पंचनामे करण्याचे आदेश दिले.  त्यानंतर महसूल व कृषी विभागाच्या वतीने प्रत्यक्ष पंचनाम्यास सुरूवात करण्यात आली. मूग व उडिदाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची सोयाबीन व कपाशी या पिकांवर मदार होती. परंतु, गत महिन्यात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन व कपाशीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. जून व सप्टेंबर दरम्यान झालेल्या पावसाने तालुक्यातील ८६ हजार ७१३ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. यात सोयाबीन २४३८५, कापूस ३१९९३, मका १५२०, ज्वारी २० हेक्टर, बाजरी १२९५, तूर ४९५७, मूग १६६८८, उडीद १०५२ तर १०५२ वरील इतर पिकांचे नुकसान झाले आहे. 
शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

५८ कोटी रूपयांची मागणी
वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात आले. प्रतिहेक्टरी ठरवून दिलेल्या निकषानुसार मदतीच्या मागणीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकसानीपोटी ५८ कोटी ९६ लाख ५० हजार ९८४ रूपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. निधी प्राप्त होताच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाईल, असे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी सांगितले. 

Web Title: The kharif season was wasted due to heavy rains; Crop damage on 86 thousand hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.