इकडे आरक्षण लढा घरी कुटुंबावर आघात; धनगर नेते दीपक बोराडेंच्या सासऱ्याने जीवन संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 12:10 IST2026-03-26T12:09:48+5:302026-03-26T12:10:51+5:30
दीपक बोराडे यांचे सासरे रामराव पाटील यांची जालन्यात आत्महत्या

इकडे आरक्षण लढा घरी कुटुंबावर आघात; धनगर नेते दीपक बोराडेंच्या सासऱ्याने जीवन संपवले
जालना : धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करीत असताना त्यांचे सासरे रामराव दामू पाटील (वय ७६, रा. छत्रपती कॉलनी, जालना) यांनी बुधवारी दुपारी बोराडे यांच्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही.
धनगर समाजाचे नेते बाेराडे यांचे सासरे रामराव पाटील हे बोराडे यांच्या जालना येथील निवासस्थानी राहतात. पाटील यांनी बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी अनंत कुलकर्णी, कदीम ठाण्याचे पोनि. जनार्दन शेवाळे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणात कदीम पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, त्यांनी कोणत्या कारणाने आत्महत्या केली, याचा शोध सुरू असल्याचे पोलिस सांगत आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दीपक बोराडे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करीत आहेत. त्यांची प्रकृती खालावत असल्याने चिंतित होऊन पाटील यांनी आत्महत्या केल्याची नातेवाइकांत चर्चा सुरू आहे.