जालना अनुदान घोटाळा: आणखी ४ तलाठी जेरबंद, अटक आरोपींची एकूण संख्या २४ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 14:52 IST2026-01-24T14:51:50+5:302026-01-24T14:52:18+5:30

अंबड व घनसावंगी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी शासनाने कोटींचा निधी मंजूर केला होता.

Jalna grant scam: 4 more Talathis arrested, total number of arrested accused rises to 24 | जालना अनुदान घोटाळा: आणखी ४ तलाठी जेरबंद, अटक आरोपींची एकूण संख्या २४ वर

जालना अनुदान घोटाळा: आणखी ४ तलाठी जेरबंद, अटक आरोपींची एकूण संख्या २४ वर

जालना : जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात २५ कोटींच्या नैसर्गिक आपत्ती अनुदान घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आणखी ४ तलाठ्यांना शुक्रवारी अटक केली. न्यायालयाने या चौघांनाही ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणातील अटक आरोपींची एकूण संख्या आता २४ झाली आहे.

अंबड व घनसावंगी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी शासनाने कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र, महसूल विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून ज्यांच्या नावे शेती नाही, अशा बोगस व्यक्तींची नावे यादीत घुसवली. या बोगस लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करून ती परस्पर काढून घेण्यात आली. या महाघोटाळ्याची तक्रार प्राप्त होताच तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली होती.

२४० गावांत २५ कोटींचा डल्ला
चौकशी समितीच्या अहवालानुसार, २४० गावांमध्ये तब्बल २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी २२ तलाठी, ७ महसूल कर्मचारी अशा एकूण २९ जणांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घोटाळ्यात आतापर्यंत २४ जण गजाआड झाले आहेत. मात्र, अद्यापही काही कर्मचारी आणि यात मध्यस्थी करणारे एजंट फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले असून, लवकरच आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

हायकोर्टापर्यंत धाव, पण पदरी निराशा
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होते. त्यांनी अटक टाळण्यासाठी जिल्हा न्यायालय ते उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र, तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात भक्कम पुरावे सादर केल्याने सर्व आरोपींचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले. अटक टाळण्यासाठी आरोपींनी मोबाईलचा वापर बंद केला होता आणि सोशल मीडियापासूनही ते लांब राहत होते.

'या' आरोपींना ठोकल्या बेड्या
आर्थिक गुन्हे शाखेने चौघांना अटक केली आहे. यात विनोद जयजयराम ठाकरे (वय ४३, रा. जालना), कृष्णा दत्ता मुजगुले (वय ३५, रा. ढालसखेडा), गणेश ऋषींदर मिसाळ (वय ३४, रा. दुधनाकाळेगाव), दिगंबर गंगाराम कुरेवाड (वय ५५, रा. जालना) या आरोपींचा समावेश आहे. या सर्वांना अंबड न्यायालयात हजर केले असता, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title : जालना अनुदान घोटाला: चार और तलाठी गिरफ्तार, कुल संख्या 24 तक पहुंची

Web Summary : जालना में ₹25 करोड़ के अनुदान घोटाले में चार और तलाठी गिरफ्तार। कुल 24 लोग पकड़े गए, प्राकृतिक आपदा में नुकसान के मुआवजे से जुड़े धोखाधड़ी में शामिल शेष संदिग्धों को पकड़ने के लिए जांच जारी है।

Web Title : Jalna Grant Scam: Four More Talathi Arrested, Total Reaches 24

Web Summary : Four more Talathi officers were arrested in the ₹25 crore Jalna grant scam. A total of 24 individuals have now been apprehended, with investigations ongoing to capture remaining suspects involved in the fraud related to compensation for natural disaster losses.