मध्यरात्रीच्या मुसळधार पावसामुळे जालना जलमय; अनेक भागांत पाणी साचले, जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 13:51 IST2025-09-16T13:47:06+5:302025-09-16T13:51:39+5:30

सीना-कुंडलिका नदीला पूर, नागरिकांची धावपळ; पुराच्या पाण्यात राजकीय नेत्यांची निवासस्थानेही!

Jalna flooded due to heavy midnight rain; Even the residences of political leaders are in flood water! | मध्यरात्रीच्या मुसळधार पावसामुळे जालना जलमय; अनेक भागांत पाणी साचले, जनजीवन विस्कळीत

मध्यरात्रीच्या मुसळधार पावसामुळे जालना जलमय; अनेक भागांत पाणी साचले, जनजीवन विस्कळीत

जालना: सोमवारी (दि. १५) रात्री जालना शहरासह परिसरात विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. रात्रभर सुरू असलेल्या पावसाने शहरातील सीना-कुंडलिका नद्यांना पूर आल्याने अनेक सखल भागांत पाणी शिरले. यामुळे नागरिकांना रात्रभर जागून काढावी लागली, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले.

रात्रभर पाऊस सुरूच
सोमवारी दुपारी ४ वाजल्यापासूनच शहरात पावसाला सुरुवात झाली होती. रात्री १० वाजेपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. मात्र, रात्री १० नंतर पावसाने रौद्र रूप धारण केले. विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या जोरदार पावसाने मंगळवारी पहाटेपर्यंत विश्रांती घेतली नाही. या अनपेक्षित पावसामुळे शहराच्या अनेक भागांत मध्यरात्रीनंतर वीजपुरवठा खंडित झाला होता.

नद्यांना पूर, अनेक भाग पाण्याखाली
या जोरदार पावसामुळे शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या सीना-कुंडलिका नद्यांना पूर आला. मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास कुंडलिका नदीचे पाणी पुलावरून वाहू लागले. लक्कडकोट, राजमल टाकी आणि बस स्थानकाजवळील पुलांवरून पुराचे पाणी वाहत होते. यामुळे लक्कडकोट परिसरातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले.

राजकीय नेत्यांच्या निवासस्थानांनाही फटका
शहरातील भाग्यनगर भागात, जिथे आमदार अर्जुन खोतकर आणि माजी आमदार राजेश टोपे यांचे निवासस्थान आहे, तिथेही पाणी साचले होते. मंमादेवी ते रेल्वे स्थानक मार्गावरील अनेक हॉटेल्स आणि दुकानांमध्येही पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचबरोबर शहरातील गुरु भवन आणि बस स्थानक परिसरही पाण्याखाली गेला होता. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे.

जनजीवनावर मोठा परिणाम
सध्या सीना-कुंडलिका नदीचा पूर ओसरला असला तरी, दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अचानक आलेल्या या पावसाने जालना शहराच्या जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक प्रशासन नुकसानीचा अंदाज घेत असून मदतकार्य सुरू करण्याची तयारी करत आहे.

Web Title: Jalna flooded due to heavy midnight rain; Even the residences of political leaders are in flood water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.