जालन्याच्या अभियंत्याची किमया; एक एकरच्या गोठ्यात १०० गीर गाई, दुग्धजन्य पदार्थांतून कोटींची उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 14:41 IST2026-02-24T14:41:15+5:302026-02-24T14:41:56+5:30
अभियंता बनला यशस्वी गोपालक; शेतीपूरक उद्योगातून शुद्ध दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती

जालन्याच्या अभियंत्याची किमया; एक एकरच्या गोठ्यात १०० गीर गाई, दुग्धजन्य पदार्थांतून कोटींची उलाढाल
श्याम पुंगळे/गणेश पंडीत
राजूर/केदारखेडा : मूळ टाकळी पालोदे येथील रहिवासी तथा राजूर येथे स्थायिक झालेले अभियंता मारोती नामदेव पालोदे यांनी जिद्द, चिकाटी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर खासगी गोशाळेचा आदर्श उभा केला आहे. अवघ्या एका गाईपासून दहा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या प्रवासाने आज शंभरी गाठली असून, त्यांच्या गोशाळेत तब्बल १०० गीर जातीच्या गाई तंदुरुस्तपणे वाढत आहेत.
सन २००६ मध्ये अभियंता पदवी संपादन केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करतानाच त्यांनी शेतीपूरक उद्योग म्हणून गोपालनाचा मार्ग निवडला. सुरुवातीला मर्यादित साधनसामग्री असतानाही त्यांनी हार न मानता नियोजनबद्ध पद्धतीने गोशाळा विकसित केली. आज त्यांच्या गोशाळेसाठी रोज सुमारे २० हजार रुपयांचा चारा-पाण्याचा खर्च होत असला तरी व्यवस्थापनातील शिस्त आणि नियोजनामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला आहे.
एका एकर जागेत अत्याधुनिक पद्धतीने उभारलेला गोठा ही त्यांच्या प्रकल्पाची खासियत आहे. गाईंसाठी स्वतंत्र मुक्त संचार व्यवस्था करण्यात आली असून स्वच्छता, वायुविजन आणि पाण्याची सोय यावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे गाईंचे आरोग्य उत्तम राहते. याचबरोबर रोजच्या खाद्यासाठी त्यांनी स्वतःचा मुरघास निर्मिती प्रकल्प उभारला असून मोठ्या प्रमाणात साठवणूक केली जाते. अभियंता असतानाही शेती आणि पशुपालन क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग करत पालोदे यांनी आधुनिक गोपालनाचा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या यशोगाथेमुळे परिसरातील तरुणांना नव्या उद्योगाची प्रेरणा मिळत आहे.
पशुमहोत्सवात पुरस्कारांची लयलूट
पालोदे यांनी आपल्या गायी पशुमहोत्सवात सादर करून गुणवत्तेची छाप उमटवली आहे. २०१९ मध्ये जालना येथे आयोजित पशुमहोत्सवात द्वितीय क्रमांक, २०२३ मध्ये शिर्डी येथे प्रथम क्रमांक, तर अलीकडेच बीड येथे झालेल्या महोत्सवात तृतीय क्रमांक पटकावून त्यांनी यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
रोजगारनिर्मितीलाही हातभार
गाईच्या दुधापासून तूप, दही, दूध, पनीर, पेढे यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करून थेट विक्री केली जाते. त्यामुळे ग्राहकांना शुद्ध उत्पादने मिळत असून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीलाही हातभार लागतो.
अत्याधुनिक बीडिंग तंत्रज्ञानाचा वापर
विशेष म्हणजे, गाईंच्या पैदाशीमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांनी ब्राझील देशातील अत्याधुनिक बीडिंग तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. यासाठी त्यांना सुखानंद पारवे यांचे मार्गदर्शन लाभले. उत्तम वंशवृद्धी आणि उत्पादनक्षम गायी निर्माण करण्यावर त्यांचा भर आहे.
अत्याधुनिक गोठा उभारला
पालोदे यांनी एका एकरात अत्याधुनिक गोठा उभारला आहे. प्रशस्त मुक्त संचार व्यवस्था, स्वच्छ वायुवीजन, पाण्याची स्वयंचलित सोय, मुरघास साठवणूक प्रकल्प आणि स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला आहे. गायींच्या आरोग्य, पोषण व उत्पादन क्षमतेसाठी वैज्ञानिक पद्धतीने संपूर्ण व्यवस्थापन केले जाते.
अनेकांसाठी प्रेरणादायी उपक्रम
एका गाईपासून शंभर गायींपर्यंतचा पालोदे यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, शिस्तबद्ध नियोजन आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी गोपालनाला उद्योगाचे रूप दिले. त्यांच्या यशामुळे परिसरातील तरुणांमध्ये पशुपालनाकडे नव्या संधी म्हणून पाहण्याची सकारात्मक दृष्टी निर्माण झाली आहे.
मातीशी नाळ तुटू दिली नाही
अभियंता झालो, पण मातीशी नाळ तुटू दिली नाही. एका गाईपासून सुरुवात केली आणि आज शंभर गीर गाईंचे संगोपन करतोय. आधुनिक तंत्रज्ञान, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि दर्जेदार वंशवृद्धीवर भर दिला. तरुणांनी शेती व पशुपालनाकडे उद्योग म्हणून पाहावे.
- मारोती पालोदे, अभियंता, राजूर.