जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 17:07 IST2025-05-08T17:04:30+5:302025-05-08T17:07:29+5:30
Stray Dogs attack News: घराबाहेर अंगणात खेळत असताना चार ते पाच श्वानांनी तिच्यावर झडप घातली आणि तिचे लचके तोडले. श्वानांनी लचके तोडल्याने गंभीर जखमी झालेल्या त्या चिमुकलीचा मृत्यू झाला.

जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
Stray dogs attack: चार ते पाच मोकाट श्वानांनी लचके तोडल्याने एका सात वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना शहरातील गांधीनगर भागात मंगळवारी (६ मे) सकाळी घडली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दरम्यान, शहरातील मोकाट श्वानांच्या बंदोबस्ताबाबत वेळोवेळी संस्था, संघटनांनी आवाज उठवून आंदोलनेही केली होती. परंतु, महापालिका प्रशासनाने श्वानांच्या बंदोबस्ताकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.
संध्या प्रभुदास पाटोळे (वय ७, रा. गांधीनगर, जालना) असे मयत मुलीचे नाव आहे. संध्या पाटोळे ही मुलगी मंगळवारी सकाळी घरासमोर खेळत होती. त्यावेळी अचानक चार ते पाच श्वानांनी तिचे लचके तोडले. श्वानांनी लचके तोडल्याने गंभीर जखमी झालेल्या त्या चिमुकलीचा मृत्यू झाला.
ही घटना समजताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच आमदार अर्जुन खोतकर यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांशी चर्चा केली. तसेच आयुक्तांना मोकाट श्वानांच्या बंदोबस्ताबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
मागील अनेक वर्षांपासून जालन्यातील सामाजिक संघटना, वेगवेगळ्या संस्था, सामाजिक कार्यकर्ते मोकाट श्वानांच्या बंदोबस्ताची मागणी करीत आहेत.
स्वच्छता निरीक्षक निलंबित
गांधीनगर भागातील मुलीचा श्वानांनी लचके तोडल्यानंतर मृत्यू झाला. या घटनेनंतर या भागातील नागरिकांनी एक ना अनेक समस्यांचा पाढा आयुक्तांसमोर वाचला होता.
आयुक्तांनी तत्काळ स्वच्छता निरीक्षक राधेश्याम लोखंडे यांना निलंबित केले आहे. दरम्यान, स्वच्छता निरीक्षकांना निलंबित करून मोकाट श्वानांचा प्रश्न मार्गी लागणार का, असा प्रश्नही आता यानिमित्ताने समोर येत आहे.