रक्ताची नाती रक्ताळली! जागेच्या वादातून भावानेच भावाचा केला खून; पुतण्यावरही हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 11:51 IST2026-03-12T11:51:03+5:302026-03-12T11:51:15+5:30
Jalna Crime: मंठा तालुक्यातील खळबळजनक घटना, आठ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

रक्ताची नाती रक्ताळली! जागेच्या वादातून भावानेच भावाचा केला खून; पुतण्यावरही हल्ला
- शेख अझहर
वाटूर (जि. जालना): घराच्या जागेच्या बांधकामावरून निर्माण झालेल्या वादातून एका भावाने दुसऱ्या भावावर चाकूने प्राणघातक हल्ला करून त्याचा खून केल्याची हृदयद्रावक घटना मंठा तालुक्यातील गुळखंड तांडा येथे बुधवारी सकाळी घडली. या हल्ल्यात भाऊसाहेब रावसाहेब राठोड (वय ५५) यांचा मृत्यू झाला असून, त्यांचा मुलगा नवनाथ राठोड हा गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
असा घडला थरार
मिळालेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब राठोड आणि संशयित आरोपी साईनाथ राठोड यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून प्लॉटच्या जागेवरून वाद सुरू होता. बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास याच कारणावरून पुन्हा शाब्दिक चकमक झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत होताच, साईनाथ आणि त्याच्या इतर कुटुंबीयांनी गैरकायद्याची मंडळी जमवून भाऊसाहेब यांच्यावर हल्ला चढवला. "तुला प्लॉट पाहिजे का? आता तुला प्लॉटच देतो," असे म्हणत साईनाथने भाऊसाहेब यांच्या पोटात चाकू खुपसला.
पुतण्यावरही केला वार
वडील आणि काकांचे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेला नवनाथ राठोड याच्यावरही आरोपींनी हल्ला केला. त्याच्या पाठीवर आणि मांडीवर चाकूचे खोल वार करण्यात आले. दोघांनाही रक्ताच्या थारोळ्यात सोडून आरोपी पसार झाले. उपचारासाठी जालना येथे नेत असताना भाऊसाहेब यांची प्राणज्योत मालवली. जखमी नवनाथवर जालन्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
८ जणांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी फिर्यादी अलका नवनाथ राठोड यांच्या तक्रारीवरून परतूर पोलीस ठाण्यात रावसाहेब राठोड, साईनाथ राठोड, संतोष राठोड यांच्यासह एकूण ८ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), १०९, १२५ सह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.