'...तर हप्त्यात सूट देतो'; जालन्यात लाच घेताना पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 11:20 IST2026-03-13T11:18:46+5:302026-03-13T11:20:45+5:30
वाळूचा टिप्पर सोडण्यासाठी लाच घेताना पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

'...तर हप्त्यात सूट देतो'; जालन्यात लाच घेताना पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले
जालना: वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी आणि मासिक हप्ता म्हणून ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंठा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या पथकाने गुरुवारी रात्री ही धडक कारवाई केली.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड आणि पोलीस अंमलदार रवी गणपत जाधव यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तक्रारदाराचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून, त्यांचा टिप्पर न पकडण्यासाठी आरोपींनी ५० हजार रुपयांच्या मासिक हप्त्याची मागणी केली होती. यापूर्वीच १० हजार रुपये स्वीकारले गेले होते. उर्वरित रकमेसाठी तगादा लावल्याने तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली.
पडताळणी दरम्यान, जाधव याने ५० हजार हप्त्याचे आणि स्वतःसाठी ५ हजार अशा एकूण ५५ हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, पोलीस निरीक्षक राठोड यांनी तक्रारदाराला "अवैध वाळूच्या इतर दोन गाड्या पकडून दिल्यास हप्त्यात सूट देऊ" अशी अजब ऑफर देत लाच घेण्यास प्रोत्साहन दिले. तडजोडीअंती ३० हजार रुपये ठरले. मंठा पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेत सापळा रचून ही रक्कम स्वीकारताना जाधव याला रंगेहाथ पकडण्यात आले. दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांच्या घरांचीही झडती घेतली जात आहे.