सरपण वेचताना काळाने गाठलं! जालन्यात आजी-नातवाचा सांडपाण्याच्या 'खड्ड्यात' बुडून अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 12:47 IST2025-12-27T12:46:20+5:302025-12-27T12:47:16+5:30
जालन्यात खळबळ : तक्रारीनंतर कंत्राटदारावर गुन्हा दाखल

सरपण वेचताना काळाने गाठलं! जालन्यात आजी-नातवाचा सांडपाण्याच्या 'खड्ड्यात' बुडून अंत
जालना : शहरातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी कुंडलिका नदी पात्रात पाईपलाईनचे काम सुरू आहे. मात्र, या कामासाठी खोदलेला खड्डा जीवघेणा ठरला असून, गुरुवारी दुपारी यात पडून ६० वर्षीय आजीसह ५ वर्षांच्या नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत असून, संबंधित कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळेच हा बळी गेल्याचा आरोप करत पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
लोधी मोहल्ला येथील रहिवासी जनाबाई आनंदराव खरात (वय ६०) या गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास नातू राज कृष्णा खरात (वय ५) याला सोबत घेऊन सरपण गोळा करण्यासाठी कुंडलिका नदी पात्रात गेल्या होत्या. नदी पात्रात सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइनसाठी मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. सांडपाण्यामुळे या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने आजी-नातू त्यात पडले. खड्ड्यात पाणी असल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला.
बांबूने शोध घेताना मुलाचा हात दिसला
मृताचा मुलगा कृष्णा खरात सायंकाळी कामावरून परतल्यावर आई व मुलगा घरी नसल्याचे त्याच्या लक्षात आले. शोध घेत असताना विठ्ठल मंदिराजवळील नदी पात्रात त्याला आईची चप्पल दिसली. संशय आल्याने त्याने पात्रात असलेल्या खड्ड्यात बांबूच्या साहाय्याने शोध घेतला असता, मुलाचा हात पाण्यावर दिसला. आरडाओरड केल्यावर जमलेल्या नागरिकांच्या मदतीने नातू राज खरातला बाहेर काढले. पुन्हा शोध घेतला असता आजी जनाबाईंचे केस अडकलेले दिसले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आजी-नातवाचे मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. शुक्रवारी मनपाच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सदर बाजार पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप भारती यांनी दिली.
कंत्राटदारावर गुन्हा दाखल
माझी आई आणि मुलाच्या मृत्यूस काम अपूर्ण सोडणारा कंत्राटदारच जबाबदार आहे, अशी तक्रार कृष्णा खरात यांनी पोलिसांना दिली होती. या तक्रारीवरून सदर बाजार पोलिसांनी संबंधित कंत्राटदारावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे प्रशासकीय नियोजनावर आणि कंत्राटदारांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.