Jalana: बदलीचा आदेश निघाला, पण चिमुकल्यांनी रडत शिक्षिकेला शाळेचे गेट लावत अडवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 17:26 IST2025-09-12T17:24:29+5:302025-09-12T17:26:17+5:30

'आम्हाला सोडून जाऊ नका!': शिक्षिकेच्या बदलीमुळे विद्यार्थी ढसाढसा रडले, शाळेचं गेट बंद करून अडवले

Jalana: Transfer order issued, but children stopped the teacher in ZP school, crying | Jalana: बदलीचा आदेश निघाला, पण चिमुकल्यांनी रडत शिक्षिकेला शाळेचे गेट लावत अडवलं

Jalana: बदलीचा आदेश निघाला, पण चिमुकल्यांनी रडत शिक्षिकेला शाळेचे गेट लावत अडवलं

- पवन पवार
वडीगोद्री (जालना):
शिक्षकांबद्दलचे विद्यार्थ्यांचे निस्सीम प्रेम दर्शवणारी एक हृदयस्पर्शी घटना जालन्यात घडली आहे. जिल्हा परिषदेतील बदली झालेल्या शिक्षिका अनिता गावडे यांना निरोप देताना घुंगर्डे हदगाव येथील चिमुकले विद्यार्थी ढसाढसा रडले. आपल्या आवडत्या शिक्षिकेला जाऊ न देण्यासाठी त्यांनी शाळेचे गेटही बंद करून अडवले, यामुळे संपूर्ण शाळेतील वातावरण भावुक झाले होते.

जालना जिल्हा परिषदेच्या संवर्ग-४ मधील शिक्षकांच्या बदल्या नुकत्याच झाल्या आहेत. घुंगर्डे हदगाव येथील जिल्हा परिषद शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अनिता गावडे यांची बदली झाल्याचे समजताच विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोठा धक्का बसला. सकाळपासूनच विद्यार्थी नाराज होते आणि रडत होते. बदली रद्द करण्यासाठी काही चिमुकले थेट मुख्याध्यापकांच्या कक्षातही गेले होते.

शाळेला निरोप देताना अनिता गावडे यांना पाहून विद्यार्थ्यांच्या भावनांचा बांध फुटला. त्यांनी एकच हंबरडा फोडला आणि 'मॅडम, आम्हाला सोडून जाऊ नका' असे म्हणत गेटच अडवून धरला. हे दृश्य पाहून शिक्षिका गावडे यांच्यासह उपस्थित सर्व शिक्षक आणि पालकांचेही डोळे पाणावले. शिक्षिकेने विद्यार्थ्यांना जवळ घेत शांत केले आणि जड अंतःकरणाने शाळेचा निरोप घेतला.

स्थानिक पालकांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून अनिता गावडे यांनी विद्यार्थ्यांना पूर्णवेळ देऊन ज्ञान दिले. त्यांच्या कठोर शिस्तीमुळे आणि प्रेमळ स्वभावामुळे विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी एक वेगळेच नाते जोडले होते. मुख्याध्यापक पांडुरंग धोंडगे यांच्यासह उगले, नागरगोजे, पवार, हेलवाडे या शिक्षकांचीही बदली झाली आहे. या सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन शाळेची प्रगती केली आणि उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण निर्माण केले. त्यामुळे सर्व शिक्षक जात असल्याचे दुःख विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केले.
 

Web Title: Jalana: Transfer order issued, but children stopped the teacher in ZP school, crying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.