Jalana: भोकरदन तहसीलमध्ये 'पोतराज आंदोलन'; सरपंचासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 17:56 IST2025-12-29T17:55:19+5:302025-12-29T17:56:30+5:30
पोतराजच्या वेशात तहसीलदारांच्या दालनात शिरणे पडले महागात

Jalana: भोकरदन तहसीलमध्ये 'पोतराज आंदोलन'; सरपंचासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
भोकरदन (जालना): उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी पोतराजच्या वेशात आलेल्या आंदोलकांनी थेट तहसीलदारांच्या दालनात घुसून डफडे वाजवत घोषणाबाजी केल्याचा प्रकार शुक्रवारी ( दि. २६ ) भोकरदनमध्ये घडला होता. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून सरपंच मंगेश साबळे यांच्यासह १३ जणांविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका प्रकार काय?
२६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे हे तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी कमरेला झाडाचा पाला बांधून पोतराजचा वेश परिधान केला होता. मुख्य रस्त्यापासून डफडे वाजवत ते समर्थकांसह तहसील कार्यालयात पोहोचले. मात्र, तेवढ्यावरच न थांबता या जमावाने थेट तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांच्या दालनात प्रवेश केला. तिथे जोरजोरात डफडे वाजवून घोषणाबाजी केल्याने सुरू असलेले शासकीय कामकाज ठप्प झाले.
प्रशासनाचा उशिरा गुन्हा दाखल
हा प्रकार घडल्यानंतर तीन दिवसांनी प्रशासकीय स्तरावर हालचाली झाल्या. नायब तहसीलदार अविनाश पाटील यांनी आज दिलेल्या तक्रारीवरून सरपंच मंगेश साबळे, सुनील शिरसाठ, सुरेश रोढे यांच्यासह १३ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. २६ डिसेंबरला घडलेल्या या घटनेबाबत गुन्हा दाखल होण्यास तीन दिवसांचा विलंब का झाला, याबाबत मात्र चर्चा सुरू आहे. पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब सहाणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.