'मुलीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात झोकून दिले, पण..."; माय-लेकीच्या मृत्यूने भोकरदन सुन्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 20:15 IST2026-03-20T20:14:14+5:302026-03-20T20:15:17+5:30
जालना जिल्ह्यातील पंढरपूर वाडीत कपडे धुताना घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रसंग

'मुलीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात झोकून दिले, पण..."; माय-लेकीच्या मृत्यूने भोकरदन सुन्न
भोकरदन (जि. जालना): तालुक्यातील पंढरपूर वाडी येथे शुक्रवारी दुपारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. गावालगत असलेल्या खदानीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या ३० वर्षीय विवाहिता आणि त्यांच्या १२ वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोटच्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात मातेनेही आपले प्राण गमावल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुलीला वाचवताना आईने घेतली उडी
मिळालेल्या माहितीनुसार, कावेरी दशरथ मोहिते (३०) आणि त्यांची मुलगी सोनाली दशरथ मोहिते (१२) या दोघी शुक्रवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास कपडे धुण्यासाठी खदानीवर गेल्या होत्या. कावेरी मोहिते कपडे धुण्यात मग्न असताना, सोनालीचा पाय घसरला आणि ती खोल पाण्यात पडली. आपल्या मुलीला बुडताना पाहून आई कावेरी यांनी क्षणाचाही विचार न करता तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि खदान खोल असल्याने दोघींचाही बुडून मृत्यू झाला.
गावावर शोककळा
घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, उपनिरीक्षक प्रकाश तायडे आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलीस पोहोचेपर्यंत दोघींचीही प्राणज्योत मालवली होती. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात पाठवले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेमुळे मोहिते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पंढरपूर वाडी गावात शोककळा पसरली आहे.