Jalana: वाळू माफियांची मुजोरी! महिला तलाठ्याच्या अंगावर घातला ट्रॅक्टर; १३ जणांविरुद्ध गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 19:41 IST2026-02-07T19:40:41+5:302026-02-07T19:41:32+5:30
अंबडमध्ये वाळू माफियांचा हैदोस! खबऱ्यांसह १३ गुन्हेगारांविरुद्ध अंबड पोलिसांत गुन्हा.

Jalana: वाळू माफियांची मुजोरी! महिला तलाठ्याच्या अंगावर घातला ट्रॅक्टर; १३ जणांविरुद्ध गुन्हे
मठपिंपळगाव (जि. जालना) : कारवाईसाठी गेलेल्या महिला तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या १३ जणांविरुद्ध शुक्रवारी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये पाच खबऱ्यांचाही समावेश आहे. ही घटना आवा-अंतरवाला (ता. अंबड) परिसरात गुरुवारी दुपारी घडली.
तहसीलदार विजय चव्हाण यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने सापळा रचला. त्यानुसार आलमगावच्या महिला तलाठी मीरा सखाराम कोल्हे व त्यांचे पथक गुरुवारी दुपारी कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी मुजोर वाळू माफियांनी त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्या बचावल्या. या गंभीर प्रकारानंतर प्रशासनाने कठोर पवित्रा घेत भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत. यात वाळू चोरी करणारे (ट्रॅक्टर मालक/चालक) कल्याण भाऊराव खडके, दत्ता पांडुरंग साकळकर, जमील जिलानी शेख, गणेश रामप्रसाद दसपुते, संभाजी कारभारी भागवत, मदन रामेश्वर चोपडे, आकाश ऋषिंदर शिंदे आणि पवन सुरेश शिंदे यांचा समावेश आहे, तर खबर देणारे विकास खंडागळे, अंकुश खंडागळे, बाळासाहेब रामप्रसाद दशपुते, सचिन पांडुरंग साकळकर आणि सोहेल जिलानी शेख यांचाही संशयित आरोपींमध्ये समावेश आहे. या कारवाईत अंदाजे चार लाख ५० हजार रुपयांची ९० ब्रास वाळू चोरी उघडकीस आली आहे.
ही कारवाई जिल्हा दंडाधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशान्वये, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल आणि उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारदी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी विजय चव्हाण, तलाठी मीरा कोल्हे, मंडळ अधिकारी विलास राजपूत आणि महसूल पथकातील सदस्यांनी केली.
आता मोक्कांतर्गत कारवाई
वाळू माफियांनी महिला अधिकाऱ्यावर हल्ला करून हद्द पार केली आहे. आता आम्ही केवळ गुन्हे दाखल करून थांबणार नाही. तालुक्यातील इतर ठिकाणी जिथे अवैध गौण खनिज उत्खनन सुरू आहे, त्या ठिकाणांची गोपनीय माहिती गोळा करण्याचे काम आमचे पथक करत आहे. त्या सर्वांवर लवकरच छापे टाकण्यात येतील. सराईत गुन्हेगारांवर तडीपारी, तसेच एमपीडीए आणि मोक्का अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे.
- विजय चव्हाण, तहसीलदार, अंबड