Jalana: धनगर समाजास एसटीमधून आरक्षण द्या; जामखेडच्या तिघांचे शोले स्टाइल आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 13:47 IST2025-09-27T13:47:22+5:302025-09-27T13:47:50+5:30
दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणास पाठिंबा देत आंदोलक पाण्याच्या टाकीवर चढून भर पावसात सरकार विरोधात देताहेत घोषणा

Jalana: धनगर समाजास एसटीमधून आरक्षण द्या; जामखेडच्या तिघांचे शोले स्टाइल आंदोलन
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : धनगर समाजास एसटीमधून आरक्षणाची अंमलबजावणी द्यावे, या मागणीसाठी दीपक बोऱ्हाडे यांचे जालन्यात उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी अंबड तालुक्यातील जामखेड येथे तीन आंदोलकांनी आज सकाळपासून पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.
भर पावसात सकाळपासून आंदोलक पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत आहेत. भगवान भोजने, देवराव मंडलिक व भगवान आबा भोजने अशी आंदोलकांची नावे आहेत. आंदोलकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी देत धनगर समाजास एसटीमधून आरक्षण देण्याच्या दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला. सरकारने या उपोषणाची दखल घेऊन आरक्षणाची मागणी मान्य करावी अशी मागणी केली आहे.
आंदोलक पाण्याच्या टाकीवर जाऊन घोषणा देत आहेत. दरम्यान, आंदोलकांना खाली उतरण्याची विनंती करणारे संभाजी भोजने यांना ओरडू ओरडू त्यांना चक्कर आल्याने ते खाली कोसळले. समाज बांधवांनी त्यांना ताबडतोब जामखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उपचारासाठी हलवले.