जालन्यात पेट्रोल पंप चालकास बेदम मारहाण; १००० लिटर डिझेल देण्यास नकार दिल्याने राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 12:29 IST2026-03-28T12:28:37+5:302026-03-28T12:29:03+5:30
जालन्यात डिझेल टंचाईचा भडका! १००० लिटर डिझेल मागितले, पंप चालकाने नकार देताच बेदम मारहाण; पहा काय घडलं.

जालन्यात पेट्रोल पंप चालकास बेदम मारहाण; १००० लिटर डिझेल देण्यास नकार दिल्याने राडा
जालना: डिझेलची अभूतपूर्व टंचाई जाणवत असतानाच जालन्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जास्तीचे डिझेल देण्यास नकार दिल्याने जालना तालुक्यातील वानडगाव येथील एका पेट्रोल पंप चालकाला दोन व्यक्तींनी बेदम मारहाण केली आहे. ही घटना काल रात्री साडेनऊच्या सुमारास घडली असून यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
सध्या राज्यात सर्वत्र डिझेलचा तुटवडा असताना, मर्यादेपेक्षा जास्त इंधन देण्यावरून वाद विकोपाला जात असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. राहुल उगले असे मारहाण झालेल्या पेट्रोल पंप चालकाचे नाव आहे.
१००० लिटर डिझेलची अवाजवी मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेनऊच्या सुमारास दोन व्यक्तींनी वानडगाव येथील पेट्रोल पंपावर येऊन एकदम १,००० लिटर डिझेलची मागणी केली. सध्याची डिझेल टंचाई आणि उपलब्ध साठा पाहता पंप चालक राहुल उगले यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात डिझेल देण्यास असमर्थता दर्शवली. त्यांनी नियमानुसार इंधन देण्याचे सांगितल्याने वादाला सुरुवात झाली.
जालन्यात डिझेल टंचाईचा भडका! १००० लिटर डिझेल मागितले, पंप चालकाने नकार देताच बेदम मारहाण; पहा काय घडलं. #jalana#marathwada#FuelShortagepic.twitter.com/y6Yi9Ljp9p
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) March 28, 2026
पंप चालकावर हल्ला आणि पोलिसांत धाव
इंधन मिळत नसल्याच्या रागातून त्या दोघांनी राहुल उगले यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी पंपावरील इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी चालकास बेदम चोप दिला. या घटनेनंतर पीडित चालकाने तात्काळ पोलिसांकडे धाव घेत संरक्षणाची आणि न्यायाची मागणी केली आहे.
तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
या धक्कादायक प्रकारानंतर जालना तालुका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी सध्या याप्रकरणी 'अदखलपात्र' (NC) गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे पेट्रोल पंप चालकांमध्ये संतापाची लाट पसरली असून, सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणातील आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेजची मदत घेत आहेत. येत्या काळात पेट्रोल पंपांवर पोलीस गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.