Jalana: कौचलवाडी शिवारात चक्क गांजाची शेती; १ कोटी रुपयांचे ४ क्विंटल गांजाचे पीक जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 12:55 IST2025-12-05T12:54:18+5:302025-12-05T12:55:00+5:30
दहशतवादविरोधी पथक आणि अंबड पोलिसांची कौचलवाडीत धडक कारवाई; एका आरोपीला अटक

Jalana: कौचलवाडी शिवारात चक्क गांजाची शेती; १ कोटी रुपयांचे ४ क्विंटल गांजाचे पीक जप्त
अंबड (जालना): अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत जालना पोलिसांना आज मोठे यश मिळाले आहे. अंबड तालुक्यातील कौचलवाडी शिवारात दहशतवादविरोधी पथक आणि अंबड पोलिसांच्या पथकाने गुरुवारी संयुक्त कारवाई करत सुमारे एक कोटी रुपये किंमतीची तब्बल चार क्विंटल (४०० किलो) गांजाची झाडे जप्त केली आहेत. या कारवाईमुळे अंमली पदार्थांची शेती करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
दहशतवादविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड आणि पोलीस निरीक्षक भगवान नरोडे यांना कौचलवाडी गावात एका व्यक्तीने गांजाची शेती केली असून तिथे गांजा काढणीचे काम सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यावरून पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष्य नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ आणि पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने कारवाईची योजना आखली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड, पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे यांच्यासह एएसआय शेख अकतर, विनोद गडदे, मारुती शिवरकर, कैलास कुरेवाड, यशवंत मुंढे, राधाकृष्ण हरकळ आणि दीपक बडूरे यांच्या पथकाने कौचलवाडी येथील ढवळीराम बारकू चारावंडे याच्या गट क्रमांक ७८७ मधील शेतात छापा टाकला.
४ क्विंटल गांजा ताब्यात
चारावंडे याच्या शेतात पोलिसांना गांजाची उभी झाडे, काढणीसाठी सुकवलेला पाला आणि फुले असा एकूण ४ क्विंटल (४०० किलो) गांजाचा मोठा साठा मिळून आला. पोलिसांनी पंचनामा करून हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला. जप्त केलेल्या गांजाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे एक कोटी रुपये आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात ढवळीराम बारकू चारावंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या तस्करीच्या जाळ्याला मोठा धक्का बसला आहे.