चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस प्रवाशांना चिरडत फलाटावर चढली; दोघांचा मृत्यू, पाच जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 18:10 IST2025-02-21T18:09:49+5:302025-02-21T18:10:56+5:30
चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट फलाटावर चढली, यावेळी समोरील प्रवाशांना बसने उडवले

चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस प्रवाशांना चिरडत फलाटावर चढली; दोघांचा मृत्यू, पाच जखमी
अंबड : फलाट क्रमांक १ वर जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट फलाट क्रमांक 3 वर चढून ७ अंबड बस स्थानकावर आज दुपारी भीषण अपघात झाला. बसने यावेळी ७ प्रवाशांना उडवले. यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य ५ प्रवाशांना जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आगार प्रमुख रणवीर कोळपे यांनी दिली.
अंबड आगारातून सिल्लोडला जाण्यासाठी बस ( क्र.एम.एच.20 बी.एल्.1606) दुपारी 1.15 वाजतां फ्लॅट क्र 1 वर चालक लावत होता. मात्र, नियंत्रण सुटल्याने बस फ्लॅट क्र 3 समोर वेगाने जात समोर उभ्या असलेल्या प्रवाशांना धडकली. यात सात प्रवाशी जखमी झाले. जखमींना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मुरलीधर आनंदरावं काळे ( 50 वर्ष रा.शेवगा) आणि शेख खलील शेख उल्ला ( 40 वर्ष रा.जुना जालना) यांचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
जखमींची नावे:
अनिता बंडू गुंजाळ वय 30 वर्ष फुले नगर अंबड,पार्वती धोंडीराम नवघरे वय 30 वर्ष रा.जामदाये ता.हिंगोली, पूजा कडुबा धोत्रे वय 4 वर्ष,हिना अलीम शेख वय 30 वर्ष रा.धाकलगाव,रेहाना शेख अलीम 1 वर्ष रा.धाकलगाव
चौकशी सुरू आहे
अपघातग्रस्त बसची तपासणी केल्यानंतर यांत्रिक बिघाड नसल्यानाचे यंत्र अभियंता चालन जालना यांच्या तपासणीत आढळून आले आहे. जखमीना महामंडळाच्या नियमानुसार उपचारासाठी खर्च देण्यात येईल.अपघातात जखमीना तातडीने रुग्ण्यालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील चौकशी सुरु आहे.
-रणवीर कोळपे, आगार प्रमुख, बस स्थानक, अंबड